आपुलाचं संवाद आपल्याशी. लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आपुलाचं संवाद आपल्याशी. लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १३ एप्रिल, २०२५

पाटोदा येथे सामाजिक समता सप्ताहानिमित्त भव्य काव्यसंमेलन – कवींच्या प्रभावी सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध

Group phota of Poet &Staff

पाटोदा येथे सामाजिक समता सप्ताहानिमित्त भव्य काव्यसंमेलन – कवींच्या प्रभावी सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध

#सामाजिकसमता#आंबेडकरीचळवळ#समतेचा संदेश#BahujanVoices#EqualityThroughPoetry#VoiceOfTheVoiceless

महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक समतेचा जागर करणारे एक प्रेरणादायी आणि हृदयस्पर्शी काव्यसंमेलन नुकतंच पाटोदा येथील शासकीय निवासी शाळेत पार पडलं.

     "डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह" या उपक्रमांतर्गत झालेल्या याकविसंमेलनात नामवंत कवींनी सहभाग घेत रसिकांची मनं जिंकली.'DrAmbedkarJayanti'

कार्यक्रमाची सुरुवात – दीपप्रज्वलन आणि प्रेरणास्थानांना अभिवादन

कार्यक्रमाची सुरुवात राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित कवींचा पुष्पगुच्छसन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.कार्यक्रमाचं प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. नितीन तरकसे यांनी केलं."Ambedkar-Thoughts"

कवींची सामाजिक भानाने परिपूर्ण सादरीकरणं

सादरीकरण


कवी हरिभगत सर यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणारी कविता सादर करत ग्रामीण वास्तवाला भिडणारे शब्द साकारले –
“जमीन शेतकऱ्याची आई, तरीही त्याचा विकास नाही.”

 लोक कवी संजय सावंत  यांनी "नळावरचं भांडण" या विनोदी कवितेच्या माध्यमातून ग्राम्य जीवनातला व्यंग आपल्या उपहासात्मक व विनोदीशैलीत रसिकांसमोर उभे केले. त्यांच्या या कमालीच्या हास्याच्या लहरी सभागृहात,उसळल्या.

परशुराम सोंडगे यांनी "आई" या भावनिक कवितेतून आईच्या त्यागाची हृदयस्पर्शी मांडणी केली अतिशय भावगर्भ कवितेतून  त्यांनी विस्कटत चाललेली कुटुंब व आटत चाललेल्या संवेदनशीलतेवर भाष्य केले.अनेकांच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या.
“मी हाडा रक्ताचे केले पाणी

कधीच रे पान्हा चोरला नव्हता.”

कवी,बाळासाहेब नागरगोजे यांनी त्यांच्या "युद्ध पेटले आहे" या कवितासंग्रहातली ' याची कुठे ही नोंद नाही.'ही कविता सादर करत स्त्रीश्रम, दारिद्र्य आणि सामाजिक विसंगतींचा वेध घेतला.
“तिच्या घामाचा एखादा कुंभ का नसेल तिथे?”

युवा पिढीचे आंबेडकरी अभिमानाचे दर्शन

विशाल म्हस्के या युवा कवीने "ऐ राष्ट्रनिर्मात्या" या भीमराव आंबेडकरांना समर्पित कवितेतून त्यांचे विचार प्रभावीपणे मांडले –
“दिधलं संविधान या देशा, जागुन रात्रीच्या रात्री...”

कवी अंकुश नागरगोजे यांनी "सावित्रीच्या लेकी" या कवितेतून स्त्री शिक्षण आणि संघर्षाची बोलकी मांडणी केली.

कवी,अजय भराटे यांनी "फणा" या कवितेतून ऊसतोड मजुरांचे वास्तववादी चित्रण सादर केले, तर सुनिल केकान यांनी "जात" या कवितेतून जातीभेदावरील अत्यंत मार्मिक भाष्य केलं –
“बोलायचं नाही कुणी कुणाच्या जातीबद्दल...”

विद्यार्थी कलाकारांनी रंग भरला कार्यक्रमात

या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे शाळेतील विद्यार्थिनींचाही सहभाग होता. प्रतीक्षा शिरसट (९वी), अन्वीता भिसे (७वी), व व्हावळे निकिता यांनी आपल्या कविता सादर करत शाळेच्या कलावंतांनीही उपस्थितांची मनं जिंकली.



कार्यक्रमाच्या यशामागचं नेतृत्व

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. रागिनी जोगी मॅडम होत्या. आपल्या भाषणात त्यांनी सर्व कवींच्या सादरीकरणाचं कौतुक करत त्यांच्या शैलीतून मनाला भिडणारा अनुभव श्रोत्यांनी घेतल्याचं नमूद केलं.

सूत्रसंचालन नम्रता बोराडे या विद्यार्थिनीने आत्मविश्वासाने केलं. स्वागतगीत व्हावळे अनुष्का व मस्के ऋतुजा यांनी गात सांस्कृतिक रंग भरले.Rashtra-Nirmata

यशस्वी आयोजनामागे शिक्षकवृंदाचा मोलाचा वाटा

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक श्री. तरकसे सर, सौ. रागिनी जोगी मॅडम, तांबे सर, मुंडे सर, मेहेत्रे सर, तांदळे मॅडम, ढोले सर, राऊत मॅडम, डोरले मॅडम, नाईकनवरे मॅडम आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले.

  • #जयभीम#DrAmbedkarJayanti#RashtraNirmata#ConstitutionMaker#भीमराज#AmbedkarThoughts

  • गुरुवार, १९ डिसेंबर, २०२४

    ग्रेटभेटः सुधीर रसाळ आणि साहित्य अकादमी पुरस्कार

     ग्रेटभेटः सुधीर रसाळ आणि साहित्य अकादमी पुरस्कार 








    पुरस्कार राव,

    हे लयं भारी झालयं बघ.गुरूवर्य  सुधीर रसाळला सरांना तू एकदाचं कसतरी गाठलंस.

    यार,तू लयचं लेट केलसं.

    जाऊ दे ते. लेट पण थेट भेटलास.

    हल्ली तू पण हॅक झाल्यासारखा वागतोस.चांगली 

    चांगली ग्रेट माणसं तुला भेटतच नाहीत बुवा. उगीच आपलं कुणाच्या भी गळयात पडतो. ग्रेट माणसाला तू शोधलं पाहिजे.तुझं भी इम्प्रेशन डाऊन नाही झालं पाहिजे ना?

    काय म्हणतोयस ?गर्दीच लय झालीय..!! 

    तुझं भी खरं म्हणा.तू तरी काय करणार? काही माणसांनी तुलाचं कॅपचर करून टाकलयं!

    त्यामुळे तुझा भी नाईलाजच असतो म्हणा. तू तरी काय करणार?

    आता खारमुरे वाटाव्यात तसचं तुला कुणाच्या गळयात बांधतात म्हणल्यावर गर्दी तर होणारचं ना? देतेत म्हणल्यावर घेणारे येणारच ना? रेवडी पहिलवानाला काय कमी असते?ते तर कवा भी लंगोट बांधून उभीच  असत्यात की.

    क्काय..? हौसे नवसे गवसे सारेचं येणार ना?

    पण पुरस्कारराव, प्राॅब्लेम काय होतोय. गुरूवर्य रसाळ सारखी ग्रेट माणसं गर्दी कसली घुसतेत?

    ते तिकडं फिरकत भी नसतेत.त्यांच काय आडलं तुझ्या वाचून?

    त्यांना तुला गळयात घालून तरी फिरायची थोडी हौस असते? ते थोडचं तुला मिरवित बसणार आहेत.

    ग्रेट ते ग्रेटचं...!! 

    ऐवढं एक लयं झॅक झालयं बघ.तू कस तरी सरांना गाठलस.त्यांच्या गळयात पडलास.

    बाबा, धन्य झालास तू.

    नाहीतर तुझी काय कमी थू...!! थू ...!!!  सुरू नाही.आपलं भी स्टेटस राह्यलाय पाहिजे ना?

    अशाचं ग्रेट माणसाच्या शोधात राहत जा.तुझी भी इज्जत  राहिल.

    चांगल्या ग्रेट माणसाची संगत बरी असते.

    माकडासोबत खेळतं बसल्यावर....तुझी तरी काय किमती राहणार?

          सर, साहित्यसेवेसाठी केलेल्या अप्रतिम कामगिरीबद्दल आम्हाला तुमचा अभिमान आहे.आपलं हार्दिक  अभिनंदन..!!

    आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!


    #साहित्यअकादमीपुरस्कार #सुधीररसाळ #मराठीसाहित्य

    बुधवार, १२ जुलै, २०२३

    पक्षफुटी,सदू आणि बंडया



    पाराजवळ सकाळ सकाळ एक टोळकं जमा झालं होतं.सकाळ पासूनचं दोन चार गाबडी नुसती तोटं वाजवीत होतं. सकाळ सकाळचं ठो..ठो...  बारं व्हायला लागलेत म्हणल्यामुळे  गलका तर होणारच ना? त्यांच्या भोवती येणारी - जाणारी माणसं गराडा टाकित हुती.जसा जसा गरदा जमा होतं व्हता.तसं ती गाबडी चेकाळतं व्हती.त्या  रामा सावकाराच्या बंगल्याकून डीजेचा भी आवाज येतं हुता.नेमकं कशाचं काय ? हे ब-याचं जनाला कळतं नव्हतं.

     सदू  यटण पाठीवर टाकून झपाझपा शॅतात निघाला होता.एवढा गराडा पाहून तेव्हं भी थांबला.उग आपला उल्लीकसा टायेम पास करावा म्हणूनचं तेव्हं तिथं घुटमळला व्हता.

    "अरं कमून  असं बारं करित्यात रं? "सबागती त्यांनी बंडयाला परशन केला. कुठं काय घडलं?त्याला काय माहित ? तेव्हं शेतकरी माणूस.लयं कुणाच्या राड्यात पडतचं नाय.

    "आरं काल मोठा भूकंप झालायं की...तुला नाय व्हवं ठावं?"बंड्या त्याच्या हातावर टाळी देत  बोलला. 

    "भूंकंप...??कुठं ?कवा ?" सदू हादरला ना?त्याला काही इश्यचं ठाऊक नव्हता.तेव्हं हादरायचं नाय तर काय?दोन च्यार थोबाडातून नुसते दातं विचकले.उगाच दाताड विचकल्यामुळे तर सदू  एकदमचं गांगरला. आयला हे कमून दात काढयत्यात कायनु? काही जणं चेकाळलेत.काही दाताड इचकितेत.काही त्या तिकडं नाचत्यात..म्हंजी हे काय तरी भारी घडलेलं दिसतंयं पण असं सा-यांन खुशीत गाजरं चघळया सारखं नेमकं काय झालं आसलं? आसला मज्जाच हादरा तरी कसा असलं? असला कसला भूंकप? त्याला प्रशन पडला. आता प्रशन नुसतं सदूला एकट्याला पडलाय व्हयं? आख्खा महाराष्ट्रालाच ह्यो प्रश्न हाय. असल्या प्रश्नांनी लोकांच्या मेंदूचं पारं भरितचं केलं की.त्याचं कुणाला टेन्शान.

    "आर,असला हादराच कुणी कवा दिला नसलं?लयं जबर हादरायं तेव्हयं."

    "जबर हादरा ?"

    हाॅं...जबराटचं.....? बंड्या गुटक्यानं लाल किटाण चढलेले दात इचकित बोल्ला.

    "बार उडीत्यात... नाचत्यात...असला कसला  ग्वाडं हादरा...? मज्जा लका...तुमची." सदू बंडयाची मज्जा घेतं बोल्ला.

    "आर,एवढंचं काय घेऊन बसला.ते बघ डीजे...पण आलाय इकडं."

    सदूनं मान वळिली. तिकडून खरचं डीजे येतं व्हता. डीजे बघितल्यावर तर सदू  पारं पपचरंचं झाला.

    "खरचं की लका..आता ह्यो डीजे कशाला?."

    "कशाला म्हंजी? नाचायला...!! बघ...बघ..नाचायला लागली पारू.... पोरं सोरं भी झाल्यात चालू."बंड्याने तर तालचं धरला.चांगलाच नाचायला लागला.

    सदूचं टेन्शाॅन गेलं असलं तरी कनफ्यूजन  पारचं वाढलं होतं.

    " अरं बंड्या हे कसला भूंकप... हे तर लग्नाच्या वरातीवाणीचं सारं.वातावराणं टाईट."

    "आयला तू का यंटम का रं? भूंकपच केलाय  लका दादांन. जबर हाबाडायं हेव्हं ."

    "दादानं...कोण्चा दादा....?"

    "आरं, महाराष्ट्रात एकच दादा....??"

    "गप,हेकाण्या...दादा कुठं एकच असतो.इथं फुटाफुटावरं दादा पडलेत? खालच्या अळीचादादा, वरच्या अळीचा,मिच मिचं डोळयाचा, तेव्हं डबका दाद्या.इथं काय एक दादा व्हयं?"

    "ऐ,यंटम... एकच दादा...वन्लि अजित दादा..." बंडयानं एकदम क्लेअरचं केलं.

    "ते  पवार सायबाचा पुतण्या का?तेव्हचं दादा ना?"

    "हाबडा दिलायं.. आपल्या दादानं."

    "हाबडा? कुणाला.??"

    "आरं,फोडलानं राष्ट्रवादी पक्ष त्यांनं... फट्दिसी."

    "आयला हे पक्ष हायत की फुगं रं? फटाफटाच फुटतेतं लका.मागं ती शिवसेना भी अशीच फाटकुणी फुटली. आता त्यांच होतं हिंदूत्वाचं मॅटर..यांचं काय?

    "दादा तेव्हं.इक्कासचा लयं नाद दादाला."

    "इक्कास?कोण्चा इक्कास? सरकार कोणाचं भी आलं तर आपलं हाय ते हायचं.शेतक-याला काय?डेंगळ?"

    "आर,इक्कासाची लांब लचक दृष्टी हाय दादा कडं.ईक्कासाठीच हा यगळा इचार केला त्यांनी.शेतक-यासाठीच तर पाऊल उचलयं दादांनी."

    "उग फेकू नक्कू.शेतक-यांच कोण ईचार करतयं? स्वार्थ असलं त्यांचा काही.आर,हे पुढारी लयं गंडयाचे असतेत?खायचं एका दातांनी नि दाखवायचं यगळच दात."

    "आर,सत्ते शिवाय प्रश्न नाय सुटतं.अॅडजेसष्ट

    "आयला ....पण ही गद्दारीचं की." सदूला काय  राजकारणातले छक्के पंजे कळतेय? ते आपला सरळं बोलत हुता.

    "गद्दारी...?नाय नाय पक्ष दादांचा खरा हाय."

    " हे तर लयच झालयं? ज्या ताटात खाल्लं त्याचं ताटात हागल्या सारखं झालं."

    "ऐ,हेकण्या,महत्वाचं काय रं? "

    " इक्कास."

    " इक्कास काय इरोधात बोंबलून  होतो का?आर, ईरोधआत असलं की नुसत्या वाटा अडीतेत? इरोधातलं आमदार म्हंजी...उग बुजगावण्या गत राहतं? आहे म्हणतं येतं नाही नाही  म्हणता येतं नाही.ईक्कास करायचं म्हणलं की सत्ता पायजी.उग तंडत बसून उपेग नसतो.म्हणून ह्यो यगळा इचार केला दादांनी."

    "आर,पण कुणी तरी ईरोधआत भी पायजी ना?सारेच एक झाल्यावर ? लोकशाही कशी तग धरिल?"

    "लोकशाहीच नक्कू टेन्शन घेऊ तू."

    "असं गापकुणई गडी फुटायचे म्हणाल्यावर काय तरी जबराटचं कारण असलं?असलं मोठाले गडी कसं काय फुटत्यात? तसली ईडी का काडी तर माग नसलं ना ?"

    "नाय नाय...दादा तेव्हं.. त्याला कोण घाबरू शकतं?"

    " तू काय भी म्हणं बंड्या.काही तरी हूकचं अडकईलं असणं? त्या शिवाय अशी मोठाले पक्ष कसे फुटतेलं? गेल्यावर्षा तेव्हं शिवसेना पक्ष फुटला तवा गुवाहाटी...डोंगार, झाडी..हाटील. सारं गडी स्पेशल इमानानं गडी सहल करून आणले हुते.त्यांनी लयं मज्जा केल्ती. त्यांचा डान्स भी आल्ता की मोबाईल वर.खोके काय ते पण भेटल हुतं जणू?"

    "खरं,हे खरं नसतं?"

    "मग हे एकदम फुकटचं कसं गद्दार हुतेल.एवढं मंत्री राहिलेलं नेतं कसं काय गळाला लागले असत्यालं?"सदूच्या मेंदूचा पारं भजं झालं होतं.

    "दादांची घुसमटं भी व्हती म्हणा तशी."

    "घुसमट?काय घुसमटं असलं बुवा? काही भावकीचं मॅटर आसलं? चुलत्या पुतण्याचं कुठं जमतं आपल्यात. पुराणा पासून तेचं आलं.भावकी ती भावकी.उण्याची वाटेकरी." सदा असा बोल्यावर बंडयाचं डोकं गरम झाल. बंडया कट्टरं गडी.

    "गप,गैभाण्या,इक्कास साठी फूटलेत दादा.."

    "इक्कास..?कोण्चा?'

    "महाराष्ट्राचा..शेतक-याचा...!!"

    "हे भारी मॅटर रंगिलं...शेतक-याच्या इक्कासाचं.

    "बरळायला माझं काय जातं? पण त्या थोरल्या वाडयाचं कसं व्हुईल?"

    "सावरकरांचा नि त्यांचा  लयं छत्तीसचा आकडा हुता."

    "ते बघ,सारेचं नाचतेत? मंत्र्याच्या स्वागतला...!!"

    "वरचं असं गुटमॅट झाल्यावर खालच्याची लयं पंच्यात हुती? मुळयादं झाल्यासारखं सांगता येत नाही.सोसता येत नाही."

    "राजकारणात कायम कुणीच कुणाचं मित्र नसतं आणि..दुश्मन नसत. राजकारणात लयं इमोशनल.व्हायचं नसतं.डोकं वापरायच असतं."

    "ते कसं?"

    "जिकडं...घुग-या "तिकडं..उदो..उदो..वाहत्या नदीत घ्यायचं हात पाय धुवून..."

    "बंड्या डोकं लका...तुला.आम्ही होकार इमोशनल होऊन मतदानाच्या टायमाला काशि करायचो.आता नक्की डोकं वापरायचं...हे काळीज काढून कुणाला नाही दयायच.

    "मग करायचा डान्स? दादांचा नाद करायचा नाय."

    सदू आणि बंड्या गर्दीत शिरले.नाचू लागले. बीजे वाजतं होता.नाद करायचा नाय....नाद करायचा..

    शुक्रवार, २० जानेवारी, २०२३

    चेहरा वाचन

     ||आपुलाचं संवाद आपुल्याशी||


    किताबे बहूत पिढी है तुने |

    मेरा चेहरा मी जरा पढो||

    बता दे मेरे चेहरे पे क्या क्या लिखा है||



     हे बाजीगर चित्रपटातील गाणं फार लोक प्रिय झालं होतं.मला तर ते खूपचं आवडलं होतं.चेहरा पण वाचला जाऊ शकतो हे मला तेव्हा कळलं होतं.पुस्तकं वाचायचं  सोडून मी चेहरे वाचत सुटलो होतो. अर्थात चेहरे वाचत बसणं सोपी गोष्टं नसते.फार रिस्की कामं असतं. ते काही दिवस मी करण्याचा प्रयत्न केला होता.चेहरे वाचण्याची काही लिपी वगैरे असते का?  लिपी वगैरे काही माहित नाही पण कला मात्र जरूर आहे. त्या माणसाला न कळता आपण त्याचा चेहरा वाचू शकतो.प्रत्येक जणचं ते वाचत असतो. पोलिस खात्यातील लोक चेहरे वाचण्यात तरबेज झालेली असतात. 

    ओळखीच्या आणि अनोळखी माणसांचे पण आपण चेहरे वाचत असतो. समोर आला की आपण त्याला स्कॅन करत असतो.मनाच्या मेमरीत ते एकदा. डाऊन लोड केले की पुन्हा पुन्हा त्याला वाचत बसतो.आपल्याला भेटलेली सारीच माणसं लक्षात राहत नाहीत.सारीच माणसं कुठल्याश्या नाजूक नात्यांच्या धाग्यात गुंफली जात नाहीत.ह्रदयातल्या आपुलकीच्या ओलाव्यांन  ओथंबून येतं नाहीत. बोलल्याशिवाय माणसाचं मन कळत नाही आणि दिसणा-या सा-यांच माणसाला आपण बोलू ही शकत नाहीत. सारीच माणसं आपल्याला कशाला बोलत बसतील?आपण नुसतं पाहून ही माणसं समजून घेत असतो. तसाच प्रयत्न असतो आपला.माणसाचे चेहरे  पण बोलके असतात.

                  तुम्ही कुण्या नटाच्या किंवा नटीच्या प्रेमात पडलाय का कधी?एखादा खेळाडू,एखादी माॅडेल तुम्हाला जाम आवडली असणार.त्यांना आपण कधी भेटलेलो नसतो.भेटणारं ही नसतो. तरी ते आपल्याला का आवडतात?एखाद्या गर्दीत एखादा चेहरा मनात रूतून बसतो.संपूर्ण अनोळखी गर्दीत सुध्दा आपल्याला काही माणसं प्रेमळ, काही खडूस,काही लबाड,काही क्रूर,काही समजस़ वगैरे वाटत राहतात.अर्थात आपण त्यांना भेटलेलो नसतो.आपला चेहरा वाचला जातोय हे लक्षात आलंयं म्हणून ही काही सावरलेली, बावरलेली माणसं आपण पाहतो.

    आपण जरं वाचलं जाणारं असू तर आपण सावध राहायला हवं ,नाही का? चेहरा प्रसन्न, सोज्वळ ठेवावा लागेल.अंतरंगच चेह-यावर उमटतं जातं.ते लपवता येत नाही.अ़तरंग चांगल कसं करायचं?चांगली पुस्तके आणि चांगली माणसं वाचायची. मग सोप्पं की. काय?

     सुप्रभात

               परशुराम सोंडगे

            || Youtuber|Blogger||

    रविवार, ६ नोव्हेंबर, २०२२

    आशा आणि त्याग

     ||आपुलाच संवाद आपुल्याशी||

    या जगातील माणसाच्या दुःखाचं कारण आशा आहे.बुध्दांने शोधलेले मानवी दुःखाचं मूळ.आशेची पाळंमूळं खणून काढण्यासाठी  माणसाची तडफड आपण अनेक धर्म ग्रंथाच्या पानापानावर  पाहतच आलो आहोत.आशेशिवाय जीवन अशक्य आहे.वैराग्य,निरपेक्ष कर्म,अश्या अनेक संकल्पनाला माणसांनी जन्म दिला.त्यांची उकल करण्यातच आयुष्यभर माणूस झिजत राहिला.वैराग्य,निरपेक्ष कर्म यांचा अनुभव कुणी घेतला असेल बरं?कर्मकांडाचे जोखड आपल्या अंगावरती ओढून माणूस आशा नष्ट करण्यासाठी झुंजत राहिला.कुठल्याचं जीवाची पिच्छा आशा सोडत नाही.

     जीव जीवनलोलूप असतो.मरण कुणालाचं नको असते.ते किती ही अटळ असलं तरी ही. त्याला हजारोवाटा असल्यातरी.

    जगण्याची  लालसा जीवाला संघर्षाच्या चरक्यात कोंबते.दुःखाची डोंगरची डोंगर अंगावर कोसळत असतानाही माणूस सुखाच्या क्षणासाठी धडपडत राहतो.

               तुम्ही  असा प्रसंग कधी पाहिला आहे का? नागाच्या जबडयात सापडलेला बेडूक.आपण जबड्यात असून ही समोरचा किटक पकडण्याचा त्याचा प्रयत्न.प्रयत्न केविलवाणा असला तरी जगण्याची लालसा जीवला जुंपून ठेवते. त्या बेडकाच्या जीभेवर वळवळणारी असते ना? ती  आशा  असते.

     आशाचा समूळ नाश अशक्य आहे पण आशा कमी करू शकतो.इच्छा नष्टं नाही पण इच्छेची तीव्रता कमी करू शकतो. छाताडावर गोळया झेलतं मरणाला ही शरण आणणारे अतुलनीय शौर्य आपण पहातोच की.आशेचा त्यागाकडे प्रवास शक्य आहे.त्यागातून ही आनंद मिळतो. त्याग आनंदाचे साधन आहे.

    मित्र हो,सोप्पं की मग आनंदाचा मार्ग.आपण योगी नाही पण  जरा त्यागी तर होऊया.बघूया ना आज जमतयं का?

     सुप्रभात...!!!

                    परशुराम सोंडगे

              Youtuber|| Bloger||

    शनिवार, ५ नोव्हेंबर, २०२२

    सकारात्मक उर्जा

     || आपुलाच संवाद आपुल्याशी ||

     

    माणसाच्या पाणी,अन्न,वस्त्र व निवारा या मुलभूत गरजा आहेत.

    गरजांचा प्राधान्यक्रम आपल्याला योग्य ठरविता आला की आयुष्याचं पलॅनिंग जमलच की. 

    हल्ली गरजांचा प्राधान्य क्रम ठरविताना आपला संभ्रम होतो आहे.आपण नेमकं इथचं  गोंधळून जात आहोत.

    या मुलभूत गरजा इतकचं सकारात्मक विचारांनाही आपणं प्राधान्य दिले पाहिजे.श्रींमतीत व ऐश्रर्यात लोळत असलेली व शरीराने धष्टपुष्टं असलेली माणसं ही  मनानं खचलेली असतात तर भिकारी,दरिद्री व विकलांग ही उत्तूंग स्वप्न उराशी बाळगून जग जिंकण्यासाठी धडपडत असतात.

    विचारांची उर्जा बाहेरून लपेटता नाही येत.सकारात्मकतेची कॅप्सूल किंवा टॅब्लेट नसते बाजारात.ती अंतरंगातूनचं उसळावी लागते.मानवी पण हे प्रचंड उर्जेचा स्त्रोत आहे. मन ती उर्जा बाहेर फेकत असते.तिच उर्जा माणसाला आतून पेटवते,तेवत ठेवते.प्रखर करते.चकाकी आणते. 

     उलट नकरात्मक उर्जा माणसाला  काळवंडून टाकते.काजळून टाकते.ग्रासून टाकते. निस्तेज करते. शेवटी माणसाच्या विझण्याचे कारण ठरते.

      सुविचार वाचून माणसं सुविचारी होत नाहीत.शाळकरी जीवनात काय आपण कमी सुविचार पाठ करतो? चांगला विचार करणा-या सवयीचं गुलाम व्हावं लागतं.तीच गुलामी माणसाला या जगाचं सिंकदर करत असते.

    सकारात्मक विचारच माणसाला आकाश कवेत घेण्याचं बळ देतो.नकारात्मकता माणसाच्या जीवनातील आनंद गोठून टाकते.पंखातले अवसान गिळुन टाकते.नकारात्मकताच माणसाला नैराश्यीच्या गर्तेत ढकलते.सकारात्मकता माणसाला यशाचं शिखरावर घेऊन जाते. सकारात्मकता व नकारात्मकता माणसाच्या विचार करण्याच्या  पध्दती आहेत.फक्त कोणती ही गोष्टं सहज आणि सकारात्मकतेनं घेणं जमलं पाहिजे. ते तेज विलोभनीय असतं.  या शिवाय सक्सेस पासवर्ड  दुसरा नाही.जादूची कांडी हीच तर असते.

     चला,आज सकारात्मकतेने ऊर भरून घेऊया. 

    सुप्रभात 

                               परशुराम सोंडगे

                        || Youtuber||Bloger||

    रविवार, ३० ऑक्टोबर, २०२२

    वीरचक्र विजेते माळी साहेब -अमर रहे


     वीरचक्र विजेते तालुक्याचे भूषण माळी साहेब आपल्यात नाहीत ही गोष्टचं फार वेदनादायी आहे.संपूर्ण स्वच्छता अभियान मध्ये काम करत असताना त्यांच्या सोबत काम करण्याची संधी भेटली. वय झालं तरी कमालीची धडाडी व सकारात्मक विचारांची उर्जा त्यांच्या अंगी होती.त्यांच्या गावाच्या व  पाटोदा तालुक्याच्या स्वच्छता चळवळीला गती देण्यामागे त्यांचा फार मोठा वाटा आहे. 

      आजची सकाळ शुभ नाही. माळी साहेब आपल्या नाहीत.ही अतंत्य दुंखद घटना आहे.मृत्यू जरी अटळ असला तरी आपल्या तून आपल्याचं एका माणसाला घेऊन जातो ही बाब  जीवनाची क्षणभंगूरताच अधोरेखीत करते.मानवी जीवनाची ही पराधिनता सांगून जाते.

      माळी साहेब शरीराने आपल्यात नसतील पण त्यांच्या आठवणी कायम मनात राहतील.तारूण्य ओसरलं तरी घडाघडी आणि जिद्द कशी उरात तेवत ठेवायची ,आपणच आपल्याशी प्रमाणिक कसं राहयच हे  त्यांच्याकडून शिकायच. मी एकदा त्यांना विचारलं होत," वीर चक्र भेटलं यासाठी तुम्ही अतुलनीय शौर्य दाखवलं असेलच ना?"

    ते हासत हासत म्हणाले," सरजी असं काही नाही.मी माझं काम प्रमाणिकपणे केले.अतुलनीय वगैरे काही नाही.मी लढाईत खेळत नव्हतो.मी लढाई लढत होतो.माझ्या समोर माझे नाहीतर देशाचे शत्रू होते.माणसानं आपलं काम प्रमाणिकपणे करावं.लोक तुलना करत असतात.कुणाला पायाशी,कुणाला डोक्यावर,कुणाला ह्दयात जागा देत असतात.दुस-याच्या ह्रदयात  जागा मिळणे ही सात भारविकत घेण्या इतकी सोपी गोष्ट नक्कीच नाही.

    त्यांच्या विचाराने आठवणीने ते कायम मानाच्या गाभा-यात तेवत राहतील.

    माळी साहेब  अमर रहे

    शुक्रवार, २८ ऑक्टोबर, २०२२

    मरगळ


    दिवा जळत राहतो.प्रकाश उधळत राहतो.निरतंर. जळता जळता दिवा काजळत जातो.नकळतं.त्याचं त्यालाच कळतं नाही.हळू हळू अंधूक होतो.काजळी त्याच्याच शरीराचा काही अंश असते.तोच अंश त्याचं तेज गिळतो. ती काजळी झाडली की तो पुन्हा नव्याने पेटतो.प्रकाशाने फुल्लारून येतो.पुन्हा जळत राहतो.अंधाराच्या उरावर प्रकाश रेषा अधिक गडद करत राहतो.



    माणसाचं भी तसचं आहे ना? माणसाला येणारी मरगळ म्हणजे काजळीच की.

    अधिकचं प्रकाशमान होण्यासाठी,तेवण्यासाठी  अंग झटकावचं लागतं ना? ती जगण्याची अपरिहार्यताच असते.आपल अंग झटकून पुन्हा तेवत राहवचं लागतं. आपल्याला काजळीने वेढलं तर गेलं नाही ना? अंग तर झटकून पाहूया.कालच्या पेक्षा आज अधिक प्रखर तेवायचं आहे ना? आपलं असणं अधिकचं ठळक करूया.

                 शुभ प्रभात.

                                     परशुराम सोंडगे

     भेट दया :prshuramsondge.blogspot.com

    साहित्य, शिल्प, नाटक, तमाशा व चित्रपट – सत्तांतरासाठीचे विषारी साधन

      साहित्य, शिल्प, नाटक, तमाशा व चित्रपट – सत्तांतरासाठीचे विषारी साधन " Love lovestory in Marathi " Chhaava-Hindi move( Vicky Kou...