संसार दु:ख मूळं

“अवघे गरजे पंढरपूर.” अलार्म वाजला. ते मंजुळ स्वर त्या शांत खोलीत पसरले. महाराज गाढ झोपेतच होते.रात्री जागरण झाले होते.रात्री कीर्तन संपवून ते अहमदनगर वरून रात्री उशिरा आले होते. झोपायला रात्रीचे तीन वाजले होते. अलार्म वाजला. त्यांना जाग आली.. अलार्म् चा राग आला. उठावसं वाटल नाही. झोप डोळयात तशीच तरळली. झोपेला असं अंगातून झटकून नाही टाकता येत ? झोपेची मिठ्ठी असते की नशा ? झोप माणसाला सोडत नाही की माणूस झोपेला सोडत नाही ? अजगाराची मिठ्ठी हळूहळू सैल होत जावी तसी झोपेची मिठ्ठी सैल होत जातं असावी. त्यांच्या नजरेचं पाखरू हळूहळू भिरभिरू लागलं. चकाचक भिंती … मखमली मऊ बिछाना… उश्या.. खिडक्यांची मलमली पडदे… भिंतीवर टांगलेली फ्रेम अर्जुनाला गीता सांगताना.. कुरुक्षेत्र अन् दोन्ही बाजूचे विराट सैन्य… रथ, घोडे, हत्ती.. शेवटी बंद खोलीत नजर जाऊन-जाऊन जाणार कुठं ? ती त्यांच्या अंगभर रेंगाळली.. हळूहळू ते आपलच अंग न्याहाळत बसले. स्वत:च मग्न झाले. आपण किती सुंदर आहोत याचा अंदाज बांधण्यातच ते गुंगून गेले. गोर अंग, काळेभोर क...