समीक्षण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
समीक्षण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ३ एप्रिल, २०२५

अर्धा कोयता’ – श्रमिकांच्या संघर्षाचा जिवंत दस्तऐवज

अर्धा कोयता’ – श्रमिकांच्या संघर्षाचा जिवंत दस्तऐवज

अलकानंदा घुगे-आंधळे यांचा 'अर्धा कोयता' हा कथासंग्रह नुकताचं वाचनात आला.कथासंग्रहाचे शीर्षकावरून आपला असा समज होतो की,हा ऊसतोड कामगाराच्या जीवनावर अधारित कथांचा संग्रह असेल पण अगदीच तसा नाही तो.या कथासंग्रहात ग्राम्य जीवनाच्या खडतर संघर्षाच्या चटके देणा-या ही अनेक कथा आहेत.

                                                                      वाटयाला आलेला संघर्ष,खेड्यातील कष्टप्रद खडतर जीवन,दारिद्रय,अज्ञान,मतलबी राजकारण,व्यवस्थेने निर्माण केलेली अनेक आव्हान व त्या आव्हानाला भिडणारी कमालीची जिद्दी माणसं या सा-या गोष्टींनी लेखिकेचे भावविश्व समृध्द झालेले दिसते आहे.जीवनातील खडतरता व अभावाची परिस्थिती व त्या परस्थितीने पिलेली माणसं हीच लेखिकेच्या लेखनाची मूळ प्रेरणा ठरलेली दिसते आहे.

                                                       या कथासंग्रहात ऊसतोड कामगारांच्या जीवनाची परवड व खेडयातील माणसांचा भयाण संघर्ष या कथामधून जाणवतो आहे.ग्रामीण भागातील शेतक-याचे,मजुरांचे जगणे केवळ हलाखीचे नसते तर ते सततच्या संकटामुळे जगण्याचा चंग बांधणा-या माणसाची ती एक लढाईचं असते.हा असंघटित संघर्ष कसा गडद होत जातो याचा वस्तुपाठच या कथांमधून मांडण्यात लेखिका यशस्वी झालेली आहे.

                              'आलिया भोगासी असावे सादर' या तुकोबाच्या उक्ती प्रमाणे आपल्या वाट्याला जे दुःख आले आहे ते भोगावे लागणार आहे.हे जगणं त्यांनी स्वीकारलं आहे.या झुंजार वृत्तीने एक एक पात्र लढत राहते आहे.झुंजत राहते आहे.प्रत्येकाची लढाई वेगळी असते. आपलीच जीवा भावाची माणसं एकमेकांचा संघर्ष कठीण करत असतात हे कटू असलं तरी सत्य लेखिकेन अनेक कथामधून मांडले आहे.

                                    माणसामाणसतील उभे राहणारे संघर्ष,फाटत जाणारी नाती,विस्कटत गेलेली कुटूंब,मतलबी राजकारण,बेगडयासारख्या जपलेल्या अभासी प्रतिमा हे सारं गावातल्या माणसाठी शापच ठरलेले आहे.कुटूंबातील संघर्ष ही माणसाचं जीवन अधिक खडतर करतो.’बगीचाकथेतील जना असेल,’आळकथेतील संपत असेल,’यशोदा’ कथेतील यशोदा असेल,’मंगळसूत्रकथेतील आप्रुगी.’शेवता कथेतील शेंवता असेल.अश्या अनेक स्त्रीयांच्या जगण्याची परवड या कथामधून लेखिका प्रभावीपणे वाचकासमोर मांडत राहते.लेखिकेच्या भवतालचा पट आपल्या समोरून सरकत जातो आणि वाचक कथामध्ये गुंतत जातो.

                                                       कथामधून नायकपेक्षा जास्त कथामधून खंबीर नायिका  त्यांनी रेखाटलेल्या दिसत आहेत.अर्थात त्या मध्यम वर्गीय स्त्रीयां सारख्या स्त्रीवादी चळवळीत अडकलेल्या नाहीत तर त्या आपली जगण्याची लढाई लढत आहेत.स्वत:स्त्री असल्यामुळे अनेक नायिका रंगवण्यात येणे स्वभाविकच आहे. फक्त स्त्रीयांच्या भावविश्वातच  लेखिका गुरफटून गेलेली  नाही तर खेडूतांच्या जीवनांच्या अनेक समस्येला शब्दबध्द करण्याचा प्रयत्न ही तिने  केला आहे.

                             दंश कथेतील शारदा,कौटूंबीक संघर्ष वाटयाला आलेली अफवा कथेतील सुबी,’छेड कथेतील दुर्गा,’विम्याचे पैसे या कथेतील दारूबाज नव-याशी झुंजत संसाराचा गाडा ओढणारी मुक्ती असेल,वृध्दाश्रम जवळ करणारी यशोदा कथेतील यशोदा,’नकोशी कथेतील तुळसा,शेंवता,‘अर्धा कोयता’या कथेतील खंबीर कांता,या सा-या  कथामधून प्रत्येकीचा संघर्ष वेगळा आहे.खंबीरपणे त्या लढत आहेत.सकारात्मक दृष्टीकोन या सा-याच कथामधून आपल्याला दिसेल.हाच लेखिकेचा लेखनाचा हेतू ही असेल असं वाटते आहे.

                        आळकथेतील नायक संपत,खचून जाऊन फडच पेटून देणारा फड कथेतील भीमा,न संपणारा संघर्ष वाटयाला आलेलावळहई कथेतील आप्पा,’अफवेचे पीक’नात्याच्या गुतंत्यात अडकलेला हताश सदा.या सा-या कथाशोंकातिका आहेत पंरतु नकोशी,ईद का चाँद,भेट,या कथामधनू सुखात्मिका ही छान रंगवल्या आहेत.जगण्याची उभारी देणा-या या कथा आहेत.

                            कथेमध्ये माणसचं नुसते नायक नाही तर बगीचा कथेतील बाग,नख-या कथेतील बैल,शिक्षा कथेतील अख्खा गावातील स्त्रीयाच नायक म्हणून पुढे येतात. असे आगळे वेगळे पण नायक लेखिकेन खुबीने उभे केले आहेत.

                               जसे कडवट झुंज देणारे अनेक माणसं असतात,तसेच खलनायक ही बेरकी आहेत.या कथा मधून तुम्हाला प्रत्येकवेळी माणसचं खलनायक म्हणून भेटतील असं नाही.वास्तवातं ही तसं असतं नाही. समाज, व्यवस्था, निसर्ग आणि नशीब ही माणासाच्या आयुष्यात अनेकदा खलनायक  ठरत असतात. या कथामधून ही दारिद्र्य,अज्ञान,अंधश्रद्धा व समाज व्यवस्था व राजकारण ही खलनायक म्हणून पेश होत राहतात.शिक्षा कथेतील खलनायक अख्ख गावच आहे.सामाजिक विषमताच खलनायक म्हणून पुढे आलेली दिसते.त्यामुळे या कथांना एक सार्वत्रिक सामाजिक परिमाण लाभले आहे.त्यामुळेच अनेक पुरस्कार पदरात पाडून घेताना अलकानंद घुगे-आंधळे यांची कथा आपल्याला दिसते आहे.

                          अलकानंदा घुगे-आंधळे यांच्या लेखनाची भाषा अत्यंत सहज आहे.संवाद आणि वर्णने ही ग्रामीण वास्तवाला धरून आहेत.शब्दयोजना सरळ आणि मोजकीच आहे.त्यात एक लय सापडते.ती लयचं माणसाला कथा मध्ये गुंतून ठेवते.वाचकांना कथेत गुंतवून ठेवण्यासाठी निवेदन शैली व शब्दसंयोजन महत्वाचे असते.बोलीभाषाचा वापर सर्रास केलेला आहे.’आता बया..! महा जीव तुमच्यात आन्‍ तुमचाजीव खेटरात,’’आता कहयाला बोलीती ती पांढरी पाल,’ ‘लई मस्ती आली का ग टवळे, नांदयाला आले तशी अजून कोणी नवा जून केला नाही.च्या मायाला झक मारली न कुठून ऊस लावला.अश्या शब्दांची पखरंड पानोपानी दिसते त्यामुळे संवाद प्रभावी झालेले आहेत.

                         सा-याच कथामध्ये तृतीय पुरूषी निवेदन शैली आहे.त्यामुळे कथा एक सारख्या वाटतात.एकजीनशीपणा उतरल्या सारख्या जाणवतात.निवेदनशैलीमध्ये अनेक पर्याय वापरायाला जागा होती पण लेखिकेने तसं काही केले नाही.

                            या कथांमधील पात्रे आपले अस्तित्व शोधत जगतात ती नुसती परिस्थितीला शरण जाणारी नाहीत, तर आपल्या हक्कांसाठी लढणारी आहेत.उरातली आग तशीच ठेवून डोळयात उत्तुंग स्वप्न रंगवणारे ही माणसं आहेत.अर्धा कोयता हा केवळ ऊसतोड मजुरांच्या दुःखाची कहाणी नाही, तर त्यांच्या संघर्षाचा,त्यांच्या जिद्दीचा दस्तऐवज आहे. अरविंद शेलार यांच मुख्यपृष्ठ  कथांच्या आशयाला साजेसं साधलं आहे.परिस प्रकाशनाने ही आपला जीव त्यात ओतला आहे.आघाडीचे लेखक बाबूराव मुसळे,यांची नेमक्या शब्दांतील प्रस्तावना कथासंग्रहाचे ढाचा सांगून जाते.त्यांची पाठराखण ही आहे.नेमक्या शब्दांत संग्रहाचे सार त्यांनी आस्तिक शब्दांत मांडले आहे. चारचौघात जायचं म्हणल्यावर थोडं सावरून आवरून जायचं असतं.,थोडसं नटून थटून ही..!!अगदी तसचं काहीसं इथं घडले आहे. बुकशेल्पवर उठून दिसेल असा हा कथासंग्रह  साधला आहे.

                     हा कथासंग्रह केवळ सहानुभूती जागवत नाही, तर वाचकाला त्यांच्या जगण्याचा विचार करायला लावतो.ग्रामीण जीवन समजून घेण्यासाठी, श्रमिकांच्या जगण्याचे तपशील अनुभवण्यासाठी हा संग्रह वाचायलाच हवा.साहित्यात वास्तववादी मराठी लेखनाचा ओघ वाढतो आहे. अर्धा कोयताहा त्याच धारेतील महत्त्वाचा टप्पा आहे. लेखिकेच्या शैलीमुळे या कथा मराठी साहित्यात अधिक गडद आणि परिणामकारक ठरतील.त्या कमालीच्या अश्वासक आहेत.

                                                                                      परिक्षण: परशुराम सोंडगे, बीड

 पुस्तकाचे नाव: अर्धा कोयता (कथासंग्रह)

 लेखिका: अलकानंद घुगे-आंधळे

 प्रकाशन: परिस पब्लिकशन सासवड,पुणे

शनिवार, २२ मार्च, २०२५

युध्द पेटले आहे – जगण्याचा चंग आणि संघर्षाच्या गर्जना करणा-या माणसांच्या कविता.

युध्दं पेटले आहे – जगण्याचा चंग आणि संघर्षाच्या गर्जना करणा-या माणसांच्या कविता.

'युध्द पेटले आहे 'हा बाळासाहेब नागरगोजे यांचा पहिलाच कविता संग्रह.महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेतून अनघा प्रकाशना मार्फत प्रसिद्ध करण्यात आला आहे.तो नुकताच वाचण्यात आला.
पिढयानपिढया वाटेला आलेला संघर्ष व काळजात घर करून राहिलेल्या वेदनांचा परिपाक म्हणजे हा कविता संग्रह आहे.
होरपळत गेलेली स्वप्न,व्यवस्थेने खुडून घेतल्या गेलेल्या जगण्याच्या आशा,वाटयाला आलेलं दारिद्रय व उपेक्षित जिणं.मराठवाड्यातील ग्रामीण भागातील वास्तव,त्याचे चटके,उपेक्षितांचे प्रश्न,सामाजिक विषमतेमध्ये भरडत गेलेले माणूसपण.जातीवादाचे उसळलेले डोंभ,दांभिक राजकारणात होरपळत जाणारी पण जगण्यासाठी पराकोटीचा संघर्ष करणारी माणसे इ.गोष्टीने कवीचं भावविश्व आकारत गेलेले असावं याचा प्रत्ययं आपल्याला कविता वाचतानी सतत येत राहतो.संपूर्ण शोषण मुक्तसमाज हे भगतसिंगाचं स्वप्न उरी घेऊन कवी धडपडतो आहे.हीचं हया कवीची काव्यप्रेरणा आहे असे आपल्याला अनेक कविता वाचताना जाणवते.
               या तप्तव्यवस्थेच्या जाळात होरपळून निघताना मनाला फुटलेल्या उकळीला कुठला ताल सूर आणि लय असू शकतो का? अलंकारिक शब्दाच्या व यमकाच्या मोहात बाळासाहेब नागरगोजे यांच्या कविता गुंतून पडत नाहीत.उकळणं जिथं नैसर्गिक तितकचं या कविता पण अकृत्रिम व स्वभाविकचं आहेत.भावनेच्या कल्लोळात अंतरंगातील शब्द उसळत राहतात.ताला सुराचे साज ती लेतं नाही.हल्लीची मराठी कविता कृत्रिमतेच्या अनेक साच्यात अडकून पडू लागली आहे.बाळासाहेब नागरगोजे यांची कविता तसल्या चौकटीत अडकत नाही तर त्या सा-या चौकटीत उलथून प्रकट होणारी आहे.
                               या कवितात विद्रोह आहे पण ऊरबडवेपाणा नाही.आक्रोश आणि टाहो नाही तर संघर्षाच्या गर्जना त्यात आहेत.आपल्या समोर असलेले प्रत्येक शस्त्र हाती घेऊन पिसाट झालेल्या भणगं माणसाची ही कविता आहे.कवीचे एक एक शब्द शस्त्रप्रमाणे अंगावर कोसळत राहतात.
 ‘युद्ध पेटले आहे’ हे शीर्षक असलेली कवितेतूनच त्याचा प्रत्ययं येतो.
भगतसिंह आभाळातून अवतरत नाहीत.
तो भयाण प्रतिकूलतेतही
फुटणारा अंकुर आहे.
भगतसिंह म्हणजे फक्त शरीर नव्हे
मृत्यूने ओढून नेलेल्या युगाचा अंत नव्हे.
युगानुयुगे चिरंतन असू शकतात अश्या विचारावर ही कविता बेतत जाते.अभावने व अस्वस्थतेने अकाराला आलेल्या भावविश्वात ही कवी जगण्याचा चंग बांधतो.
‘प्रिय डॉमिनिक’ या कवितेत कवी म्हणतो.
तू मेली असतीस तर
मी झोपलो असतो निंवात
पण हाय !
तू जगायचा निर्णय घेतलास.
आपल्या आईच्या वाटयाला आलेलं जगणं व संघर्षाची या जगात कुठे ही नोंद घेतली जाणार नाही.कष्टक-यांच्या घामाचे रक्ताचे इथे मोल नाही.दखल कुणी घेत नाही.याची खंत त्याच्या मनात आहे.उपेक्षित माणसाची व्यथाचं क्रांतीचे बीज पेरत असते ना?
‘खांडसरीत ढोरमेहनतीने तिच्या अंगावरची
कातडी सोलून निघाली होती.
पण या घटनेची कुठे ही नोंद नाही.’
तिसरा डोळा उघडून महादेव तांडव सुरू करतो.जग विनाशाच्या बिंदूवर असते.तेव्हा जग हादरत.युगालाचं आपले युगपुरुष उभे करण्याची अपरिहार्यता असते.ते होणारच असते.ती सृष्टीची ही अपरिहार्यताचं असते.
'या क्रांती मार्गावरचा मुसाफिर म्हणून
मी पहिला नव्हतो
आणि शेवटचा ही नसेल..!!
परिवर्तन ही विश्वाची अटळता आहे तसेच शोषणाची वंशावळ ही युगानुयुगे तशीच चालत आलेली आहे.
हि विषवल्ली आजची नाही रे
युगानुयुगे ती फोफावत आलेली आहे.
ज्यांनी ब्रिटनला,जाॅन ऑफ आर्कला रसरसत्या आगीत लोटले.क्रॉसवर्ड जीससच्या हातावर खिळे ठोकले.सत्य सांगणा-यांच्या डोळ्यांच्या खाचा केल्या....
खिचपत पडणे,पिचून जाणे, तुटणे. वाकणे किंवा मोडणेचं मान्य नसलेला प्रचंड आशावाद पाानोपानी पेरत जाणा-या
 या कविता आहेत.
समग्र क्षेत्रात सुरू झालेला संघर्ष कवी विशद करतो.युध्दाचा शेवट काय असेल याची फिकीर सैनिकाला नसते.जग बुडाले तरी त्याची त्याला पर्वा नसते.
युध्द अटळ असते.ते कुणी लादत नाही.लादून घेत ही नाही.समाजात स्वार्थ पिपासू,सत्ता पिपासू लोक फसवे मुखडे घालून वावरतात.
धर्माच्या जातीच्या गुंगीत ठेऊन माणसाला धूंद बनवतात.ती धूंदी माणसाचा मेंदू बधिर करते.
भकास मराठवाडय़ातील कंगालत्व ते आपल्या प्रखर शब्दातून मांडत राहतात.
चोहीकडून घेरलेले असले तरी कवी हताश होत नाही.तो सर्वांना आव्हान करतो.गस्त जागी ठेवा.
अंधाराच्या उरावर काठी आपटत पहाटेची स्वप्न पाहणारा नायक या कविता मधून तो उभा करत राहतो.
'फक्त
सत्तेच हस्तांतरण
म्हणजे स्वातंत्र्य नव्हे
लढा संपलेला नाही.
स्वातंत्र्य अजून मिळालेले नाही.'
 कवितामध्ये शब्द संयोजन कवीच्या समृध्द अनुभव विश्वाचं, वाचनाची व व्यासंगाची फलनिष्पती आहे. राजकीय फसवणूक आणि माणसातील माणुसकी हरवत चाललेला काळाच्या पाठीवर ही कविता आपले ओरखडे ओरखडीत पुढे सरकते आहे.
‘पुढच्या युध्दाच्याच
गर्भधारणेचा मोसम असते
इतिहासाचे गाढव
पुन्हा त्याचं चौकात तसेच ओसाड उभे आहे.’
या संग्रहातील कविता शोषण,अन्याय, क्रांती आणि सामाजिक परिवर्तनाच्या धाग्यांभोवती गुंफलेल्या आहेत.कवीच्या लेखणीतून व्यक्त होणारे विचार हे केवळ वेदनांचे वर्णन नसून संघर्षाच्या गर्जना आहेत.परिस्थितीस शरण जाणारी नाहीतर ती या व्यवस्थेविरूध जंग पुकारणारी कविता आहे.हे युध्द शोषकाच्या विरोधात शोषितांनी पुकारलेले आहे.यातून श्रमिकांचे जगणे आणि त्यांच्या दुःखाची खोल समजूत प्रकट होते.कवी आपल्या' चक्रव्यूह' या कवितेत आपल्या मनाची पराकोटीची अस्वस्थता आपल्यापुढे मांडत राहतो.
'माझ्या दारातनू रक्ताचे पाट वाहत असताना
मी मनशंतीसाठी नाही प्रयत्न करू शकत
ते रक्ताचे पाट रूंद होत जातात त्यांची उंची वाढत जाते
आणि ते थेट माझ्या पायाला स्पर्श करतात
तेव्हा मी लेखणी उचलतो
पाझरत राहतात काळजातून
साचलेल्या माझ्या वेदना.
कवी समाजव्यवस्थेतील ढोंगीपणावर घणाघाती टीका करतो.
 

 बाळासाहेब नागरगोजे यांच्या कवितेची भाषा ही सरळ, साधी नाही ती गुढ आहे.अंशत: अबोघ आहे.पण अत्यंत प्रभावी आहे.ती कुठेही अलंकारिक शब्दांच्या शोधात गुंतलेली नाही,तर ती अधिकची धारदार होत गेलेली आहे.
मुक्तछंदातील सहजशैली,आक्रोश आणि विद्रोहाचा सूर,बोलीभाषेतील थेट संवाद
संस्कारांची जाणीव,सामाजिक विसंगतीवर तिरकस आणि प्रखर विद्रोह ती करत राहते.
‘तुला माहितीये?
आपल्या आयुष्याचे बांधिल गि-हाईक उरावर घेत
माझ्यातील वेश्या
खंगत चाललीये.’
त्यांची कविता वाचताना जाणवतं की, हे शब्द कुठल्याही लयीत बसवलेले नाहीत, तर ते युद्धात उचललेली शस्त्रं आहेत.ते कुठेही सौंदर्याच्या चौकटीत अडकत नाहीत कारण त्यांचा उद्देश मनोरंजन नाही तर परिवर्तन आहे.
    "युद्ध पेटले आहे" हा संग्रह समकालीन मराठी साहित्याच्या विद्रोही धारेतील एक आहे.पारंपरिक कवितांप्रमाणे ही कविता निसर्ग, प्रेम,भक्ती यांसारख्या विषयांभोवती फिरत नाही तर समाजाच्या गाभ्यातील दुःख आणि संघर्षाच्या खोल तळाशी जाऊन भाष्य करते. माणसाच्या मनात राखेत गुडूप झालेल्या निखा-यावर ती फुंकर घालते.गुलाम या कवितेत कवी म्हणतो.
’खूप प्रिय असतात
त्यांना गुलाम.
गुमान काम ऐकणारे सांगकामे '

कवींच्या कविता जशा तत्कालीन समाजातील दुःख प्रतिबिंबित करतात,तश्याचं मनाच्या गाभा-यात खोल तेवत असणा-या घटना,व्यक्ती व भवना अपोआपच बाहेर येत राहतात.
साळू काकू,सुंदरा अक्का ,आण्णा,तुम्ही गेल्यानंतर आणि रद्दी या सारख्या कविता मनाच्या तळाशी चाललेला कोलाहलचं फक्त प्रकट करत नाहीत तर युक्रेन,इस्त्रायलचे युध्द सारख्या जागतिक घटनावर ही आपल्या संवेदाना प्रकट करत राहतात.त्यामुळेचं कवितेंचा पट विस्तारात जातो.
                                नामदेव ढसाळ यांच्या विद्रोही साहित्याची आठवण या कविता वाचतानी येते.काही अंशी नामदेव ढसाळ यांची जी अस्वस्थता कवितेतून जाणवत राहते.एक भणगता ही भाषाशैलीत जाणवत राहते.या कवीच्या कवितेची उग्रता आणि वास्तवदर्शी भाषा प्रभावी वाटते.बाळासाहेब नागरगोजे यांच्या कवितेत आशावाद आणि क्रांतीची भाषा आहे.हा संग्रह केवळ संवेदनशील वाचकांसाठी नाही तर तो संघर्ष करणाऱ्या प्रत्येक सामान्य माणसासाठी प्रेरणादायी आहे.हे कवितासंग्रह वाचल्यानंतर एक निष्क्रिय वाचकही विचार करायला लागतो, आणि हाच या कवितांचा सर्वात मोठा प्रभाव म्हणता येईल.


                              












                              ही कविता केवळ तक्रारीत अडकलेली नाही,तर संघर्षाला प्रवृत्त करणारी आहे.केवळ व्यक्तिगत दुःख मांडत नाही, तर संपूर्ण समाजाच्या वेदनांची साक्ष देणारी आहे पंरतु विद्रोह,अक्रोश व संघर्षानेच या कविता भरावलेल्या आहेत.त्यात मानवी जीवन सुखच्या आशेवरचं पुढे सरक असते.मानवी जीवनातील सुखाचा जो पदर असतो.तो कुठे ठळकपणे पुढे येत नाही.भाषाशैलीत सहजता व सुलभता नाही.कधी कधी आशय फारच गुढ होत जातो व कविता अबोधाच्या चकोरीत फिरत राहते.
 कवीने पहिल्या प्रयत्नातच संघर्षशील,आक्रमक आणि परिवर्तनवादी कविता साकारल्या आहेत. त्यामुळे हा संग्रह मराठी साहित्याच्या विद्रोही परंपरेत एक नवीन आणि मजबूत आवाज म्हणून पुढे येईल यात शंका नाही.
        साहित्या अकादमी पुरस्कार प्राप्त कवी विरा राठोड यांची पाठराखण व कवी अनंत कराड यांची प्रस्तावना या संग्रहाला लाभलेली आहे ही या संग्रहासाठी मोठी उपलब्धी आहे.मोजक्या शब्दात त्यांनी कवीच्या भावविश्वाचा व कवितेचा आशय व्यक्त केला आहे. मुखपृष्ठ ही वेगळया धाटणीचं असलं तरी प्रभावी आहे व संग्रहातील कवितांवर ते चपखल बसलं आहे. सुभाष कुदळे,यांनी ते चित्तारले आहे तीची भाषा असली तरी एकदम उचच्तम काव्यानुभूती देणारा हा कवितासंग्रह सर्वांनी वाचायलाच हवा असा आहे.
वाचताय ना?
पुस्तकाचे नाव:युध्द पेटले आहे
कवी : बाळासाहेब नागरगोजे
प्रकाशन : अनघा प्रकाशन, ठाणे
                                                                                                           परशुराम सोंडगे,बीड
                                9527460358

सोमवार, १० मार्च, २०२५

सिनेमाचे पडद्यावरचे पात्र आणि समाजाची भावना: एक वास्तव विचार


बरेच माणसं आता मेंदूचा वापर कमी करू लागले आहेत.

ह्रदयचं त्यांच मेंदूचं काम करू लागले आहेतं.

ह्रदयाला काही बुध्दी नसते.तिथं नुसता भावनांचा कल्लोळ असतो.

मेंदूचं कन्फ्यूज झाला आहे.

त्यामुळे बरीचं माणसं विचित्र बोलतात.वागतात.

त्या जुवेकरचचं घे ना?

तो चक्क अक्षय खन्नाला अजून ही बोलत नाही.

का म्हणून काय विचारता ? 

अक्षय खन्नाने औरंगजेबाचा रोल केलाय ना? नुसता रोल करेना का?कुणी कुणाचा ही रोल करते पण इतका हुबेहुब रोल करत असतेत का कुठं? 

काय डेंजरस रोल वठवला गड्यांनी? तो खरचं औरंगजेब वाटतोय.

 तो रोल केल्यामुळे भयंकर राग आलाय त्या जुवेकरला त्या अक्षय खन्नाचा.त्याने (म्हणजे औरंगजेबाने अक्षय खन्नाने नव्हे) इतका शंभू महाराजाना त्रास दिला.त्याला कसं बोलायचं? नुसती चीड येते हो त्याची.संताप पण.

आता चित्रपटात माणसं रोल करतात म्हणजे...?? ते खरे थोडेच असतात?जुवेकरला हे मान्य नाही. खरचं तो नाही बोलला त्या अक्षय खन्नाला.अजून पण नाही बोलत तो त्या खन्नाला.

त्या विकी कौशल सोबतचं तो राहयचा? असचं नाही.विकी कौशल म्हणजे साक्षात शंभू राजेच त्याला वाटत असतील.असं नक्की त्याला फिलींग येतचं असणार.अक्षय खन्ना जर त्याला औरंगजेब वाटत असेल तर विकी कौशल शंभू राजेच वाटत असणार ना? आणि रश्मिका त्याला महाराणी येसूबाई वाटत असणार.

असं एकटं जुवेकरलाचं होतं असं नाही अनेकांना होतं आहे.

नाटकातली सिनेमातली पात्र खरी वाटू लागतात तेव्हा त्या नाटकाचं त्या सिनेमाचं.खर तर ते यश असतं.त्या अभिनयाचं यश असतं. पूर्वी ही खलनायक स्टेजवर आले की माणसं ओरडतं,त्याला शिव्या द्यायचे.

अमरीश पुरी हे कायम खलनायकचं असतं.त्यामुळे त्याला ही लोक खलनायकचं समजतं. वास्तविक जीवनात त फार हवे होते. तेच शक्तिकपूरचं झालं होतं.अनेक मुली महिला त्याला घाबरतं.तो कायमचं बलात्कार करी.शक्तीकपूर चित्रपटात,असला की एक बलात्कार पाहावासा लागे .रम्मा रेडी नावाचा एक साऊथचं खलनायक होता. त्याचा प्रतिबंध चित्रपटातील नाना स्पॉट हा डायलॉग खूप गाजला होता.तो नुसता पडद्यावर दिसला तरी माणसं थरकाप असतं. रस्त्यावर चालताना लोक त्याच्या गाडी पाहिली की बाजूला होतं. त्या गडयाचा दरबाराची तसा होता.

प्रभू रामचंद्र चंद्राची पात्र करणारा त्रिवेदी असो की द्रौपदी साकारणारा रूपा गांगुली असो कि रामायणातील सीता करणारी दीपिका असू लोक यांची पूजा करतात. नितीश भारद्वाज लोक कृष्ण समजून बसले आहेत.

 आमच्या गावाची त-हा विचारूच नका.आमच्या शाळेत सैराट चित्रपटावर एक मुलांनी आणि एका मुलींनी डान्स केला. पोरं झक्कास नाचली.

पंचाईत ही झाली की ती पोरं शाळेत आली की मोठी गंमतच होई. सारं जगाचं त्यांच्या मागे लागे.

पोट्टी नुसती ओरडतं. अर्चीन परश्या...अर्चीन परश्या..!! ते रडकुंडीला येतं.हसावं का रडावं हेच कळत नव्हतं.

नाटकाचा आणि सिनेमाचा आपल्या भारतीय समाजावर फार होतो. सहसा युवा वर्ग सिनेमातल्या हिरोला फॉलो करतात.आज ही मालिकेतल्या कपड्याचे दागिन्यांचे डिझाईन्स महिला फॉलो करतात. तात्पुरतं नाटकाच्या सिनेमाच्या विश्वात आपण वावरत असतो.

ते काही तासांत असावं. माणसानं आपल्या वास्तवात यावं ना? तसं घडतं नाही.माणसं त्याचं व्यक्तीरेखात अडकून पडतात. त्यामुळेच केरला फाईल,काश्मीरी फाईल व अलिकडचा दीघे नंबर एक दीघे नंबर दोन असे चित्रपट राजकीय लोक काढतात व आपली वोट बॅक मजबूत करतात.

त्यात त्यांना यश ही येते.

माणसं भावूक होतात.आपली सदसद्विवेक विवेक बुध्दी विसरून जातात.त्यामुळेच सुपारी बाज इतिहासकार आणि अभ्यासक यांच फावते आहे.

मला या सा-याचं टेन्शन्स नाही मला त्या अक्षय खन्नाचं टेन्शन्स आले आहे.

आता औरंगजेबाच्या कबरीचं ही राजकारण रंगलयं.कबरं येथे का ठेवायची?ती उकडून टाकावी.

औरंगजेब हा आपल्या स्वराज्याचा दुश्मन होता.शंभू राजांना त्यांनी हालहाल करून मारलं.

त्या औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात का ठेवायची? आजही काही लोक तिथे नमाज पठणाला जातात चादर चढवतात.औरंगजेबचं,उदात्तीकरण करणारे लोक आता,असूच कसे काय शकतात? हे प्रश्न काही वावगे नाहीत. आपला

इतिहास आता ख-या खोटयाच्या तावडीत सापडलेला आहे. आता काय करायचं?

हे असचं चालू राहिलं तर?

अक्षय खन्नाचं काय होईल याची मला चिंता वाटते.

त्याला सारेच क्रूर औरंगजेब समजात. 

त्याच्या जीवावर ही भूमिका बेतू नाही.

दुसरं काय?

 रिश्ते वही सोचं नई...!!

 जमाना ही दिलवालों का है| 

दिमाग का कोई काम नही.


                    परशुराम सोंडगे बीड

गुरुवार, २० फेब्रुवारी, २०२५

"छावा (Chaava) मराठी चित्रपट – बॉक्स ऑफिसवर तुफान गाजतोय!"



छावा, चित्रपट तुम्ही पाहिलायं का? 
याचं उत्तर तुमचं 'नाही' असं असेल तर
हे काय हे जिणं तुमचं..!!
Chaava Movie Sambhaji Maharaj Son Of Shivaji Maharaj Vicky Kaushal










पहा, ना मग उशीर कसला करताय? तुम्हाला तो पाहायचा तर आहेच ना? मग बघा ना लवकर...!! उशीर का करता..?
 हे पहा तो थिएटरला जाऊन पाहयचा आहे.कुठं ही आणि कसा ही पाहयचा नाही.
मज्जा नाही येणार?
साॅरी..!! छावा चित्रपटाची मज्जा नाही घेऊ शकत कुणीचं.आपलं काळिज कुणी होरपळून काढताना कुणी सिनेमा एन्जॉय करू शकत का? ते शक्य नाही.
धडपडणारे जर ह्रदय तुम्हाला असेल तर तुम्ही न रडता तो चित्रपट पाहू नाही शकत.
काय म्हणता?
इतकं इमोशनल का होताय.साधा चित्रपट तो? फार तर तो छान जुळून आला आहे असं म्हणा.कलाकाराचं कौतुक करा फार तर. 
चित्रपट तो.एक कलाकृती म्हणूनच पहा ना? कुणाचं पात्र कसं रंगलय? हे सांगत बसा.आहो,रडताय काय तुम्ही? ही एक कलाकृतीची आहे याचं भान ठेवा.ते सारं सारं खोटं असतं.सारं रंगवलेलं असतं. चित्रपट गृहातचं
शिवगर्जना वगैरे .... हे फार अति होत हं...!!
खरं तुमचं.ते सारं रंगवलेलं आहे. मला माहिती ही आहे ते सारं खोटं घडतयं.इफेक्ट दिलेले सीनस् आहेत ते सारे.
सारं सारंचं खोटं पण आम्हाला खरं का वाटतयं सारं.आता आताचं घडतयं असं का वाटतयं सारं..?
विकी कौशल्य,ती रश्मिका ते सारे कलाकार आहेत हे का विसरलोत आम्ही. ते सारे खरचं वाटू लागलंय.
इतकं इमोशनल टच का होतोय?आमच्या मनाच्या पटलावर हे सारं चलचित्र पिढयानं पिढया कोरले गेलेले आहे त्यामुळे ही असेल कदाचित.
मराठ्यांचा इतिहासाचं रक्ताने लिहीला गेलेला आहे.कंकू पुसलं जाताना अनेकीच्या आश्रूंच्या ज्वाला झाल्यात...ठिणग्या उठल्यात.प्रत्येकीच्या पुसलेल्या कुंकूवाच्या,त्यागातून हे स्वराज्य आणि स्वाभिमानाचा यज्ञ पिढ्यान पिढया धुमसत राहिला आहे.
अजून ही धुमसतचं राहणार आहे. स्वराज्यासाठी प्राण तळहाती घेताना इथला प्रत्येक माणूसन् माणूस पेटला होता.
आमचा इतिहास ज्वलंत आहे.तो आम्हाला असाचं आमच्या छातीत पेटता ठेवायचा आहे. कुणीतरी राखेत धगधगत्या निखा-यावर फुंकर मारली.तो पुन्हा...रसरसून आला असेल का? असचं काही तरी घडते आहे हा चित्रपट पाहताना.एवढं नक्की...!!! प्लीज...!!! कुणी त्या इतिहासाचा काथ्याकूट पुन्हा नका करत बसू. त्या पुराव्याच्या संदर्भाच्या झंझळात नका इतिहास आम्हाला सांगत बसू.
शट अप..!!! 
आम्हाला असाचं हा धगधगता निखारा प्रत्येक काळजात धुमसतं ठेवायचा आहे. असाचं इतिहास आम्हाला हवा आहे. 
शपथ..!! या चित्रपटात इतिहासाचं जिवंत केला गेलाय आमचा.

Chaava Movie Sambhaji Maharaj









त्या निर्मात्याचा लयचं खिसा भरतोय.बाॅक्स ऑफिसवर तुफान राडा केलाय छावाने...!!
भरू दया की. पोटात दुखू देऊ नका.
सैराट सारखा एका लफड्याचा चित्रपट आपण डोक्यावर घेतला होता. हा तर आपला इतिहास आहे. 
मृत्यू ही जिथे शरण येतो.त्या वीराची ही गोष्टं.
नसानसात स्फुलिंग चेतवणारा इतिहास आहे हा..!!!.ही नशा,ही धूंदीच आम्हाला हवी आहे.
थँक्यू. !!! छावा टीम.


बुधवार, १८ सप्टेंबर, २०२४

कर्णाच्या भावविश्वाचं चित्रण करणारी कांदबरी –मृत्यूजंय


"मृत्युंजय"
ही शिवाजी सावंत यांनी लिहिलेली मराठी कादंबरी आहे, जी महाभारतातील कर्णाच्या जीवनावर आधारित आहे. ही कादंबरी कर्णाच्या जीवनाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकते आणि त्याच्या संघर्षमय जीवनाची कथा सांगते. कर्णाच्या दृष्टीकोनातून लिहिलेल्या या कथेच्या माध्यमातून लेखकाने समाजातल्या विषमतेविरुद्धचा त्याचा लढा, त्याची दुःखे, त्याच्या नैतिकता आणि त्याचे विचार यांचा सखोल अभ्यास केला आहे.

कथानक:

"मृत्युंजय" कादंबरी सात भागांमध्ये विभागली आहे, आणि त्यामध्ये कर्णाच्या जीवनाचे विविध टप्पे उलगडण्यात आले आहेत. कादंबरीत मुख्यतः कर्णाचा संघर्ष, त्याचे दानवीरपण, त्याची मैत्री, त्याचे राजनिष्ठा आणि त्याच्या आयुष्यातल्या विविध घटना यांचा समावेश आहे.

कर्णाला जन्मतःच समाजाने नाकारले, कारण त्याच्या जन्माची गोष्ट गुप्त ठेवली गेली होती. सूर्यदेवाचा पुत्र असूनही त्याला समाजात स्थान मिळाले नाही. त्याच्या अंगावर कवच कुंडले असतानाही तो आपल्या जन्माच्या सत्यामुळे अपमानित होत राहिला. मात्र त्याने स्वतःच्या सामर्थ्याने आणि निष्ठेने आपली ओळख निर्माण केली.

कर्णाच्या जीवनातील मोठी घटना म्हणजे त्याची दुर्योधनाशी मैत्री. दुर्योधनाने कर्णाला स्वीकारले, आणि कर्णाने त्याला आपल्या मित्र म्हणून आपले जीवन समर्पित केले. दुर्योधनासाठी कर्णाने अनेक मोठे त्याग केले. कादंबरीत कर्णाच्या मैत्रीला, त्याच्या निर्णयांना आणि त्याच्या भावनात्मक संघर्षांना मोठे स्थान आहे.

साहित्यिक वैशिष्ट्ये:

शिवाजी सावंत यांनी "मृत्युंजय" मध्ये कर्णाच्या भावनात्मक प्रवासाला खूप सुंदर शब्दात मांडले आहे. त्याच्या विचारसरणीचा आणि निर्णयांचा खोलवर अभ्यास केला आहे. लेखकाने महाभारतातील इतर पात्रांच्या भूमिकाही या कथेच्या माध्यमातून उलगडल्या आहेत, ज्यामुळे कादंबरी अधिक व्यापक आणि प्रभावी बनते.

निष्कर्ष:

"मृत्युंजय" कादंबरीतून कर्णाचा जीवनसंघर्ष, त्याची मानवी प्रवृत्ती, त्याचे नैतिक द्वंद्व आणि त्याच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण घटना सुंदरपणे मांडण्यात आल्या आहेत. कादंबरी महाभारताच्या कथेचा एक नवीन पैलू उलगडते, ज्यामुळे वाचकांना कर्णाच्या जीवनाची एक वेगळी आणि सखोल दृष्टी मिळते.



गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०२०

*उंदरीन सुंदरीन; बाल कल्पनालालसेचे चोचले पुरवणाऱ्या कविता

मराठी साहित्यात बालकुमारांसाठी फारसे लिहिले जात नाही. जे थोड फार लिहले जाते. त्यात तोच तोपणा व अनुकरण जास्त असते. पांरपारीक चौकटीतच लिहील जात. चौकोटी मोडण्याचं धाडस मराठी साहित्यात फारसा होताना दिसत नाही. बालकांसाठी लिहायच म्हणजे फारच कठीण काम असत. त्यासाठी लहान व्हाव लागत. आपल्या भावविश्वावर बालकांच भावविश्व बेताव लागत. बालकांच वय कल्पनालोलुप असत. त्यांच्या संवेदना व जाणीवा वेगळ्या असतात.अभिव्यक्तीची भाषा वेगळी असते. त्यांच्या पातळीवर जाऊन आपल्या मनावर चढत गेलेले प्रौढत्वाचे स्तर अलगद बाजूला करावे लागतात. बालसाहित्य लिहिताना अनेकदा शिंग मोडून वासरात शिरण्याचा ही प्रयत्न होतो परंतु त्या लेखनाला अकृत्रिमता प्राप्त होत नाही. प्रौढत्वाचा एक दर्प त्यात डोकावत राहतो. दर्जेदार बालसाहित्य ही काळाची गरज आहे. चांगल्या संस्काराची रूजवण, मूल्यांचे बालमनावर रोपण, भाषेचे समृध्दीकरणं, संवेदना, जाणिवाची व नेणिवांच प्रगल्भीकरणासाठी अंकुरणक्षम बालसाहित्याची आवश्यकता आहे. संकारक्षम लिहीण तर धाडसाच काम. त्यात भवतालाच्या वास्तवाचे चटके देणं ही तर महाकठीण गोष्ट. असा अनोखा प्रयत्न कवी विठ्ठल जाधव यांनी केला आहे. ‘उंदरीन सुंदरीन’ हा बालकविता संग्रह नुकताच हाती आला. नाव ऐकून कुणालाही वाटेल की हे बडबड गीताचं पुस्तक असेल. पण तसं नाही ते. आपण पुस्तक हाती पडल्यानंतर चाळण्याच्या उद्देशाने जरी पाने उलगडत राहीलो तरी त्यातल्या एकेक कविता आपण वाचत राहतो. वाचल्याशिवाय पुढे जाऊच शकत नाही. इतक हे पुस्तक आपल्याला जखडून ठेवत. बालकांसाठीच हे पुस्तक मोठ्यांना पण रमून ठेवतं. विठ्ठल जाधव हे नाव काही मराठी साहित्याला नवीन नाही. ग्रामीण साहित्यिक म्हणून त्यांची ओळख आहेच. ’पांढरा कावळा’ या बहूचर्चीत व पुरस्कारप्राप्त कांदबरीचे ते लेखक आहेत. नादमधूर भाषा, गेय नी लय व ताल पकडणारी शब्दयोजना, बोली भाषेतील शब्दांची रेलचेल, अनेक नवनवीन शब्दाची पखरंड जाधव यात करू शकले आहेत. सहजता व नैसर्गिकता हे त्यांच्या भाषाशैलीचं सामर्थ्य आहे. आपल्या अंगावरील सहज एखाद पिस काढून समोरच्याला गुदगुल्या कराव्यात इतक्या सहजतेनं ते शब्द प्रयोजन करत राहतात. वाचता वाचता आपण नकळत ताल धरून नाचू लागतो. तालबध्द शब्दांची हीच तर जादू असते. जाधवांच्या शब्दांत जादू आहे. उदा: ‘उंदरीन सुंदरीन कुरूकुरू शेंगा लाडूचा डब्बा नकटा बिब्बा. गोल गोल.’ असेल़ किंवा ‘वाजती ढग गड गड गड चमके वीज चम चम चम सर येऊ दे सर सर सर अगं भिजू दे चिंब चिंब चिंब.’ बालमन कल्पनालालसू असतं. अनेक कल्पनाचित्र डोळ्यासमोर तरळलं राहतं. रंग रेषा वापरण्याऐवजी कल्पना चित्र रेखाटण्यासाठी शब्दचं वापरलं तर? शब्दांनीच चित्र डोळ्यासमोर रंगवल तर? ते अधिक आंनददायी असू शकेल. असे अनेक चित्र कवी आपल्या शब्दांनी वाचकासमोर उभा करतो. कल्पानालालसेच चोचले पुरवत राहतो. उदा: ‘एक वानरं,भरदुपारी विद्यापीठात आलं शोधत नवे काही, विभागात हिंडत राहीलं.’ किंवा ‘एक पोरग चुकलं गाडीत बसताना हुकलं गाडी जाता कारखान्या कोयतेधारी ऊसतोडण्या…’ कल्पनेच्या जगाला वास्तवाचा कठोर स्पर्श नाही पेलवू शकत. तरलं तरल स्वप्न लहरी तंरगणाऱ्या या नाजूक वयाला वास्तवाचे हळूवार चिमटे घेण्याचं काम ' उंदरीनं सुंदरीन ' या बालकविता संग्रहात कवी विठ्ठल जाधव यांनी केले आहे. कल्पनेच्या झुल्यात बसून वास्तवाच भान देणारी ही कविता आहे. उदा: बाप रगत ओकतो, दुष्काळी राज्यात या कविता असतील किंवा फाटत गेलेली आपली कुटंब व्यवस्था व आटत गेलेला कौटुंबिक जिव्हाळा असेल यासाठी खालील काही ओळी पुरेश्या आहेत ‘दारात कुत्रा नाही घरात मांजर नाही घर कसे सुने सुने? दार लावून जेवताना दाटत का नाहीत मने?’ किंवा ‘सगळी लेकरं,आईला सारखी प्रेमाला पारखी शेवटी ती.’ तसेच ‘निळेशार शांत पाणी झाड पापण्या कमानी कधी कंठातून गाणी कधी दुष्काळी कहाणी.’ आणि *‘जंगलातील सारी शांतता* *मोबाईल रिंगटोनने भंगली* *कोल्हेकुई, डरकाळी* *नेटवर्क व्यस्तने थांबली'* विदीर्ण होत चालेला असा भवताल असेल किंवा नात्यामध्ये येत गेलेली कृत्रिमता असेल ते चपखल शब्दांत सार बसवतात. बालकवितामध्ये सारेच चांगल चुंगलच असाव अस थोडच असत ? कवी जाधव यांच हे वेगळेपण आहे. नाजूक कोवळ्या बालमनाला दाहक वास्तवभानाची झालर कवी आपल्या खास शब्दातून लावतो. वास्तवभान बरोबरच समाजभान, राष्ट्रप्रेम, भावनिक बंधाचे अधिकचे दृढीकरण, पर्यावरणस्नेहही या कवितेतून दिसते. या कविता जश्या कल्पना लालसेचे चोचले पुरवणाऱ्या आहेत तश्याच त्या संस्कारक्षमपण आहेत. दासू वैद्य यांचा मलपृष्ठावरील या कवितासंग्रहाविषयीचा थोडक्यातला मजकूर ही पुस्तकाचे अंतरंग उलगडून दाखवायला पुरेसा आहे.
               कवी विठ्ठल  यांनी बाल कुमारासाठीचा हा कविता संग्रह लिहिण्याचा धाडसीपणा केला आहे. बाल आणि कुमार या वयातील भाव विश्वात फार भिन्नता असते. त्यांना एका धाग्यात गुंफण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचं वर्गीकरण झालं असतं तर ते अधिक छान झालं असतं. अर्थात हे माझं वैयक्तिकच मत आहे. एका पुस्तकात कविता छापल्या म्हणून त्यांच मोल कमी होत नाही. इसाप प्रकाशनाचे दत्ता डांगे यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे. मुखपृष्ठ व आतील रेखाटन दिवंगत प्रमोद दिवेकर यांनी सुरेख केले आहे. प्रत्येक कवितेला रेखचित्र दिले आहे. बालसाहित्यात शब्दांसोबत चित्र असेल तर उत्तमच असतं. शब्दांचे भाव अलगद त्या रेखाटनात चिकटले जातात. ती बालसाहित्याची गरजच असते. मराठी बालसाहित्यात जुन्या चौकटी मोडून या कविता अधिक गडद होतील यात शंका नाही. मराठी बालसाहित्यात त्या कमालीच्या आश्वासक आहेत यात मात्र शंका नाही. *उंदरीन सुंदरीन* (बालकवितासंग्रह) *विठ्ठल जाधव* इसाप प्रकाशन, नांदेड पृष्ठे; ४२, मुल्य; ४० ₹. ---

साहित्य, शिल्प, नाटक, तमाशा व चित्रपट – सत्तांतरासाठीचे विषारी साधन

  साहित्य, शिल्प, नाटक, तमाशा व चित्रपट – सत्तांतरासाठीचे विषारी साधन " Love lovestory in Marathi " Chhaava-Hindi move( Vicky Kou...