शनिवार, १७ सप्टेंबर, २०२२

त्या मराठवाडायाला




      







त्या मराठवाड्याला

फक्त

  मतदानाच्या दिवशी

झोपेतून उठवलं तरी पुरेसं आहे

तो ऊसाच्या बुंध्यापाशी

असा कोणी

 माणूस बांधला आहे ?

हातां-पायांतल्या साखळदंडांना

इथं चमकावित राहतात माणसं

वेठबिगारीचा वारसा

चालवित राहतात माणसं

हे इतकं सुस्त पडलेलं

कोणत्या परुडाने 

फूकलेलं गाव आहे....?

घोषणेवरच देतो ढेकर

विकासाचे स्वप्न न पडलेला

इथला माणूस...

मुंबई मनसोक्त चघळून

थूंकून टाकते पान- मराठवाड्यासारखे...

जातींच्या खूराड्यात सरपटणारी माणसं,

जगण्याचे सोपस्कार उरकून

मातीत कूजण्यास होतात मोकळी

पोटावरच्या टाक्यांवर हात ठेवून

घरी जाणाऱ्या बाईचे

गर्भाशय हरवले आहे..

एका रस्त्याच्या कडेला

सकाळ - संध्याकाळ

एक खरजूलं कूत्रं असतं 

निरर्थक

नख्यांनी स्वतःला रक्तबंबाळ

करीत बसलेलं...

असा उभा नांगूर धरला तर

इथं मूलींची कोवळी हाडं

येतील वर..

अनुशेषाच्या टपरीवर

मिळतो मावा, गायछाप,

कोंबडा कटेल, चारमिनार,

120........300

बेसुर, बेभान वारा,

माशा बसलेले तोडलेले

बोकडाचे मुंडके

उकांडा उधळून गेलेले बदगे..

सामूहिक बधिरपणाचे वारुळ


वाढत गेले आहे नेहमीच

मराठवाड्याच्या आत्म्यावर..

आणि त्यामुळेच,

अंगावर वाढत गेलेल्या बाभळी

आणि डोळ्यांत फूटलेली निवडूंगं

बोचत नाहीत आम्हाला..

माझे निरिक्षण आहे की,

ऋतू होतात बेइमान इथे

पण माणसांचे खून पाडण्यात

इथे कोणतीही

अनियमितता नाही...

मला तरी अजून

हे कळलेलं नाही

की,

मराठवाडा निघाला कोठून

आणि पोचला कुठे...?

मराठवाड्याची सावत्र आई

फेकते ताटात 

उरलेल्या

भाकरीचा टुकडा- मुकडा

पश्चिम महाराष्ट्राची साखर

शुभ्र पांढरी आहे,

अशी वंदता आहे..

पण मला ती नेहमीच

रक्तवर्णी दिसते...

जन्माला येणाऱ्याने    


असे विनातक्रार

बेगुमान

जगण्याचे लोढणे ओढणे

ही अवनतीची असीम अवस्था आहे..

तूम्ही जरुर म्हणा..

हे सुवर्णयुग आहे

पण,

दररोज तोंडावर थुंकणाऱ्या आरश्याला

कसं टाळायचं....?



©️   *बाळासाहेब नागरगोजे*

      📱9403599807

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

साहित्य, शिल्प, नाटक, तमाशा व चित्रपट – सत्तांतरासाठीचे विषारी साधन

  साहित्य, शिल्प, नाटक, तमाशा व चित्रपट – सत्तांतरासाठीचे विषारी साधन " Love lovestory in Marathi " Chhaava-Hindi move( Vicky Kou...