शुक्रवार, १३ जानेवारी, २०२३

कधी कधी खरं बोलूया

 ||आपलाचं संवाद आपुल्याशी ||


कधी कधी खरं बोलूया.

*************************



 शालेय जीवनात अनेक सुविचार आपल्या कडून गोठून घेतले जातात.घरात ही माणसं मुलांवर चांगले संस्कार करायचे म्हणून सदैव उठता बसता संस्काराच्या उपदेशाचे डोस पाजत असतात.त्यात 'माणसांनं खोटं बोलू नाही.' हा सुविचार प्रामुख्याने सांगितला जातो.

मुलांचं मन निर्मळ असतं.ते निरागसं असतं. कोवळ मन नाजूक असतं.थोडक्यात काय तर मुलांची मन संस्कारक्षम असतात.काही संस्काराचे बीज आपण त्यात पेरले तर उगवू शकतात.खरं बोलणं हा सुविचार माणसाच्या मनात का रूजतं नाही?मूलं जसं मोठं मोठं होतं जातं तसं तसं ते अधिक लबाड बोलत राहतं. खोटं बोलण्याची एक कला आहे .ती हळूहळू आत्मसात करत राहतं.

     खोटं  बोलणं हे एक चातुर्य समजलं जातं.जी माणसं सराईतपणे खोटं बोलतात त्यांना हे जग व्यवहार चातुर्य समजत. खरं बोलणारांना अर्थातच मूर्ख समजलं जातं.आपण मूर्ख आहोत हे मान्य करणारा सज्जन माणूस अजून या पृथ्वीतलावर अवतारायचा आहे.त्यामुळे या जगात जिकडे तिकडे सदैव सातत्याने कारण असताना ,काहीच कारण नसताना ही माणसं खोटं बोलत राहतात.

           कधी कधी तुम्ही काही मिनिटे ही खरं बोलून बघा.कसला गजब होतो. काही मिनिटे ही तुम्ही खरं खरं बोलू शकत नाहीत.अनुभव घ्या.हे जग फक्त माणसं खोटं बोलू शकतात या एकाच गोष्टींवर चालते आहे याचा दिव्य अनुभव तुम्हाला येईल.

आश्चर्य याचं वाटतं की माणसं सदैव खोटं बोलत राहतात पण खरं बोलण्याचा आग्रह  कायम धरत असतात.इतकं पण खोटं बोलू नाही अशी माफक सज्जनतेची आवं पांघरणारी  अपेक्षा ही हल्ली करतात.

मापात,पचलं असं खोटं बोलावं  अशी इच्छा करतात.पचवू शकालं इतकं खोटं बोलणं अपेक्षित असते.

बाबांना खोटं बोलला म्हणून मुलांचं कौतुक करणारी आई याचं जगात आहे.वरिष्ठांना खोटं बोलून आॅफीस मधल्या गोष्टी लपवून ठेऊ शकला म्हणून पार्टी देणारी घेणारी माणसं ही असतात की.छान आणि पचलं इतकं खोटं बोललं म्हणून कोतुक करणारी गुरुजी तुमच्या आयुष्यात आलेच असतील. बाॅयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड असत्याचे निस्सीम भक्त असतात.

सत्याच्या बेगडात  खोटं गुंडाळून ते आपल्याला बाजारात विकायचं असतं म्हणून हे जग खोटं बोलते आहे. बोलत राहणारं आहे.

बरं,खोटं बोलण्याचं काही परिमाण नाही. त्यामुळे माणसं किती खोटं बोलतात हे मोजता येत नाही.माणसं किती ही  स्पेशलं खोटं बोलू शकतात! 

 माणसं खोटं का बोलतात ? प्रत्येकाची कारणं वेगळी असतात. कधी कधी माणसं काहीचं कारणं नसताना ही खोटं बोलतात.उगीचं खरं काय बोलावं म्हणून माणसं खोटं बोलतात.फोनच्या संवादामध्ये  सर्वाधिक खोटं बोल जातं.खरं बोललं तरी काही हरकत नसते  तरी माणसं स्पेशल खोटं बोलतात. सामुहिकपणे एका सुरात खोटं बोल जातं.पक्षाचा नेता खोटा बोलला की सारा पक्ष तेचं बोलत राहतो.मिडीयापणे एका सुरात खोटं बोलत राहते.

 राजकरणात माणसांनं खरं बोलू नाही असा एक राजकरणचा मंत्रच आहे.खरं बोलणा-या माणसांनी राजकरणात पडू नाही असा ही एक सल्ला  दिला जातो.

या जगात एकदम खरं बोलणारा माणूस असण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे जगातील सर्व  लोक राजकारण प्रिय आहेत.राजकारणी आहेत.घराघरात काय कमी राजकारण असते?

राजकारणात फेकू आणि  नौटंकी करणा-या माणसांचा सक्सेस रेशव  जरा जास्त आहे. सहसा लबाड आणि नटवं बोलणारी माणसं राजकरणात यशस्वी होतात.

    ही माणसं लबाडं बोलतात हे माहीत असून ही  लोकं त्यांना डोक्यावर घेतात.आपला नेता मानतात.

  'माझे सत्याचे प्रयोग' हे म.गांधीचं पुस्तक तुम्ही वाचलं असेलच? खरं बोलणारी आणि वागणारी माणसं या जगानं चक्क खोटी करून टाकली आहेत.

खोटं बोलण्याची सवय लागली आहे माणसांना. 

माणसं किती ही खोटं बोलत असली तरी विजय सत्याचा होतो.सत्य अजिंक्य असतं. आपल्या देशाचं ब्रीदचं सत्यमेव जयते आहे.ते उपनिषदांतून घेतलेले आहे.सत्याचा आग्रह हा फार प्राचीन आहे.युधिष्ठराला ही खोटं बोलायला लावणारा सर्वज्ञ भगवान परमात्मा आपलाचं देव आहे.आपण त्याचेच अंश आहोत.

देशाचं ब्रीद आहे 'सत्यमेव जयते 'म्हणून या देशासाठी थोडं थोडं खरं बोलण्याचा सराव सुरू करू आज सकाळ पासून. 

जपून हं. सत्य कडू असतं.खरं बोललं की सख्ख्या आईला पण राग येतो.

 सुप्रभात....!!!

              परशुराम सोंडगे

             ||Youtuber||Blogger||

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

साहित्य, शिल्प, नाटक, तमाशा व चित्रपट – सत्तांतरासाठीचे विषारी साधन

  साहित्य, शिल्प, नाटक, तमाशा व चित्रपट – सत्तांतरासाठीचे विषारी साधन " Love lovestory in Marathi " Chhaava-Hindi move( Vicky Kou...