शापित राजहंस रविंद्र महाजनी व मी


काही घटना,काही माणसं,काही प्रसंग,काही गाणी मनात उतरतं उतरत खोलवर रुजतं जातात. त्यांचं आपलं एक अतुटं नातं तयारं होतं.मोरपिसाचा रेशीम स्पर्श कसा अलवार अनोखं चैतन्य  नसानसात जागवून जातो तसं आठवणींचा  स्पर्श गंध ही अंतरंगात खोल तरंग उठवत राहतो.एखादया आठवणीचा पापुद्रा उचकटला गेला की सारं भळभळत राहतं.ह्रदय नुसतं ओलावून पाझरतं राहतं.

ऐन तारूण्याच्या उंबरठ्यावर  असताना एक गाणं मनावर रेशीम ओरखडे ओढून गेले. ते गाणं होतं. हा सागरी किनारा....़ओला सुगंध वारा..ओल्या मिठीत आहे रेशमी निवारा...

 आताच्या सारखं गाणं ऐकावंस वाटलं की लगेचच एका क्लिकवर नव्हतं ऐकता येतं.त्यासाठी फार तरसावे लागे.

त्याकाळी अशी थेटर पण नसतं.व्हीसीआर आणि टीव्ही असतं.त्या व्हिसीआरवर  सिनेमा दाखवला जायचा. ही  सिनेमाची पर्वणी अख्ख्या  गावाला दिली जायची एखादा सार्वजनिक उत्सव असेल किंवा उत्सव,एखादं सिलेब्रेशनसाठी अख्खं गाव एकत्र येऊन सिनेमा एन्जॉय करायचं.

लग्नाच्या वरातीत  असे सिनेमा दाखवले जाऊ लागले होते.अश्याचं एका लग्नाच्या वरातीत मुंबईचा फौजदार हा पिक्चर पाहण्याचा योग आला.त्या चित्रपटाची कथा वगैरे फार काही लक्षात राहिलं नाही.  पण गाणं मात्र पार काळजाला भिडलं होतं.सागरी किना-यावर ओल्या मिठीत रेशमी निवारा शोधण्याचं स्वप्न मला त्या सिनेमांना दिलं.इतकं रोमांचकारी स्वप्न आपल्या जवळ आहे याचं कोणं अप्रूप ही मला वाटतं होतं.

अथांग सागराच्या साक्षीने रंगलेला हा रोमान्स विलक्षण  होता. तो रांजबिंड हॅन्डसम तरूण आणि ती त्यांची नवथर प्रियेशी.अगदी त्यावेळी त्या कलाकारांची नावं माहीत नव्हती.ते माहीत करून घ्यावेत असं ही त्यावेळी  वाटलं नाही.

   समोर अथांग सागर... ती पायाला हळूवार स्पर्श करणारी वाळू,त्या उसळणा-या लाटा.तो आसमंत व्यापून टाकणारा आवाज.थंडगार झुळझुळणारा वारा.....आणि ओलती चिंब भिजलेली प्रिया.तिचा रेशमी स्पर्श. तो विलक्षण मिठ्ठीतला उबारा...


कल्पनेतूनचं सारं अनुभवाच्या पातळीवर आलेलं.खेडया पाडायतल्या  लोकांना सागरी किना-यावरील या नितांत प्रणयाचं स्वप्न या गाण्यांना नक्की दिलं होतं. लोकांचं कश्याला सांगू मला तर नक्की दिलेलं आहे.आपण त्या हिरोसारख देखणं असावं असं वाटे.कधी कधी त्याचा हेवा ही वाटे. रविंद्र महाजनी व रंजना इतका,उत्कटं व नितांत प्रमय मराठी चित्रपटात तसा पुन्हा काळजाला भिडला नाही.

     मी तर समुद्र प्रत्यक्षात पहिला ही नव्हता.कल्पनेनंच सारं पुढे उभे राही. ते गाणं आणि समुद्र व त्या प्रणयाचं सुंदर स्वप्न उरी बाळगून मी जगत होतो.

   नोकरी लागल्यानंतर मी  पहिल्यांदा समुद्र पाहिला  तेव्हा हे गाणं गुणगुणत  काही किमी एकटाचं किना-यावर चालतं होतो.

मी हरवलो म्हणून  ग्रुप ही परेशान झाला होता.एखादं स्वप्न माणसाला किती तल्लीन करून जातं नाही? आठवणींच्या कप्प्यात साठवून ठेवलेले शब्द,सूर आणि तो रोमान्स मी अनुभवत होतो.तेव्हा पासून हे गाणं असचं मनाचा ठावं घेत राहिलं आहे.

     गाणं लागलं की ते रविंद्र महाजनी व रंजना यांचा प्रणय मनात नुसता दरवळतो राहतो. कधी कधी रस्त्यावर ही गाणं ऐकू आलो की मी तल्लीन होऊन जायचो.

 
काल परवा कळलं की रविंद्र महाजनी हे जग सोडून गेले.ते पण घरात एकटं असताना.मृत्यू झालेलं ही कुणाला कळलं नाही.इतका माणसाच्या गराड्यात  असणारा  देखणा नटची अशी एक्झिट मनाला चटका लावणारी आहे.मनावर एवढं गारूड असणा-या माणसाविषयी आपल्याला फार काहीचं माहिती नाही? इतकं एकाकी पणाचं दु:ख त्यांच्या वाट्याला का यावं? एक व्यक्ती म्हणून ते कसे होते हा अनुभव मला नाही पण माझे ते माझ्या स्वप्नातील एक सुंदर प्रियकर होते. त्यांचा अंत असा व्हावा ही फारच चुरका लावणारी गोष्टं आहे.माझ्या आठवणींच्या जगात  मात्र सदैव

रविंद्र महाजनी गुंजतचं राहणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

युध्द पेटले आहे – जगण्याचा चंग आणि संघर्षाच्या गर्जना करणा-या माणसांच्या कविता.

धर्मयोगिनी अहिल्यादेवी- आजच्या पिढीला मूल्यांचा आरसा दाखवणारं पुस्तक

जत्रातील प्रेमाची गाेष्ट