तुला पहाते रे
#TulaPhateRe
तुला पहाते रे
![]() |
एका अतृप्त आत्म्याची प्रेम कथा |
मी पराग.नवीन शहर, नवा जाॅब.पुणे हे माझ्यासाठी नवीनचं शहरं होतं. पुण्याला,जाॅब लागला आणि एका अपार्टमेंटमध्ये मी खोली घेतली ती पण तिसऱ्या मजल्यावर.पहिलाचं दिवस होता.झोप येत नव्हती. नविन जागा म्हटलं की झोप सहसा लागत नाही.जागाचं होतो.बाहेर लख्ख चांदण पडलं होतं.मी खिडकीत उभा राहिलो.बाहेरच्या अंधारात काहीतरी हलतंय असं वाटलं.माझं लक्ष गेले.बाजूच्या गॅलरीत एक सुंदर स्त्री उभी होती.ती टक लावून माझ्याकडेच पहात होती.एकटक .!! मी तर घाबरलोच.अशी अनोळखी स्त्री अशी आपल्याकडे पहाते आहे ही कल्पनाच मला विलक्षण व विचित्र वाटली.असल्या चांदण्या रात्री. 'तुला पहाते रे'
मी फार वेळ तिच्या कडे पाहू शकलो नाही. नजरानजर झाली.चक्क तिन मंद स्मित केल.माझ्या अंतरंगात अनोख चांदण बरसून गेलं.ती कुमारिका नव्हती तरी मला ती खूप आवडली.कुणी पहाते आहे म्हणून आपल्या प्रेमात आहे असं कसं समजावं? असा मी कोण लागून गेलो होतो?पहिल्याच नजरेत माझ्या कुणी परस्त्री प्रेमात पडायला?तिच्याकडे पाहण्याचं मला धाडस झालं नाही.
"आताचं अमृताची बरसून रात्र गेली." हे गीत मी म्यूझिक सिस्टीमवर लावलं.ते गुणगुणू लागलो.झोपेचं खोबरं झालं होतं.सकाळी सारं कसं शांत शांत होतं.मी आवरून ऑफीसला गेलो.एवढं खरं तिचा चेहरा आणि रूप.... मी विसरू शकलो नाही. दिवस भर मन पटलावर तो चेहरा उमटत राहिला.
दुस-या दिवशी मी खाटेवर बसून मोबाईल बघत होतो.रात्री बारा वाजले होते.अचानक खिडकीतून थंड हवेचा झोत आला.मी डोकं वर केलं आणि ती तिथेच गॅलरीत ती उभी होती.राखाडी रंगाच्या साडीत.लांब केस मोकळे सोडलेले...नि चेहरा इतका सुंदर व बोलका की विचारूच नका.मी थबकलो.तिचे डोळे मोठे आणि ओठांवर मंद हसू.ती माझ्याकडे पाहून हसली,लाजली आणि पटकन घरात गेली.माझं हृदय जोरात धडधडलं.ही कोण होती? भास झाला की काय? नाही..!! ती गॅलरीत पलीकडे पाठमोरी उभे राहून केस विचरत होती.कुणी रात्रीचं असं केस विचरते का? नक्कीच ती... नखरे करत असावी. असल्या बायका.... असेच नखरे करत असतात. छत्तीस नखरेवाली...!!! "तुला पहाते रे
नखरे करणा-या बायका पण पुरूषी मनात ७एक वेगळाच ढोल वाजवत असतात बरं?ती रोज दिसू लागली.कधी खिडकीबाहेर,कधी कॉरिडॉरच्या शेवटी, कधी अपार्टमेंट मागच्या बागेत.ती इतकी सुंदर होती की मी तिच्याकडे पाहतच राहायचो.तास नि तास. माझ्या रात्रीचं तिनं असं पार भजन करून टाकलं होतं. माझी,झोप होत नव्हती.
एका रात्री ती एकदम गॅलरीत जवळ आली.तिचा आवाज मऊ,पण थंड होता.सुंदर मुलीचा आवाज सहसा सुंदर असतं नाही पण हिचा आवाज फारच अप्रतिम होता.
"पराग, पराग...!!!" तिने आवाज दिला.मी तर दचकलो.मी थरथरलो.
"तुला माझं नाव कसं कळलं?" मी अजून कुणालाच माझा परिचय दिला नव्हता. हिला माझं नावं कसं माहित?
" नाव. ?? कसं कळलं हे महत्वाचं नाही. कळलं हे महत्वाचं आहे.ॲम आय,राईट..?" तिचं असं समोर असणं माझ्यासाठी विलक्षण गोष्ट होती.माझा प्रश्न तिनं सहज टाळला होता.
"तुम्हाला माझं नावं कळलं पण मला कुठं तुमचं नावं कळलं?"
"मी सावित्री..!! तू मला असं आहो जाहो का बोलतोस? मी तर तसं नाही बोलले तुला?"
"तुम्ही सिनियर आहात मला."
"इतकी थोराड दिसते मी..!!" तिनं तिचा पदर अंगभर लपेटून घेऊन,लडीवाळ स्वरात म्हटलं.माझ्या लक्षात आलं होतं.हे प्रकरण जरा ओव्हर दिसते आहे.परपुरूषासमोर असं कुणी लाडात येत का?
" छे..!!! तुम्हाला थोराडं कोणं म्हणेल?"
"ते तर आहे. मी थोराड,असते तर तू असं एक टक माझ्याकडे कशाला बघितले असते?" चेह-यावर,आलेली भट मागे सारत ती बोलली. त्यात सौंदर्याच्या गर्वाचा अनोखा दर्प होता.
"असं काय बोलतेस? मी कशाला पाहू तुझ्याकडे?"
"खोटं बोलायचं नाही.पराग सर.आम्हा बायांना सारं सार कळतं." ती हासत बोलली.ती बोट नाचवत बोलली.तिच्या नाचणा-या बेटाकडे मी पहात राहिलो.
"तुला नाही आवडत का तुझ्याकडे असं पाहिलेलं."
"मी कुठं नाही म्हटलयं.तुला पहाते रे..!! " तिनं चक्क माझ्याकडे पाहत असल्याचा पोझ घेतला तिचं,ते पहाणं मला आवडलं असलं तरी ते फार विचित्र वाटलं.
"तू इतरांपेक्षा वेगळा आहेस असं मला वाटतं.माझा गैरसमज नसावा. नाही का..??"
"पण तू इथे इतक्या रात्री कशी..??" तिचे डोळे खाली गेले.
"मी माझ्या नवऱ्याला चुकवून येते.तो आता घरात नाही."
"कुठं आहे तो?"
"तो कामाला गेलाय.नाईट शिप्टं असते त्याची. खूप दुष्ट आहे तो. पराग,मला स्वातंत्र्य नाही पण तुझ्यासाठी मी येऊ शकले."
"त्याला हे कळलं तर?"
"त्याला कसं कळणार हे ? तो घरी नाही आता. मी ही नाही दिसणार त्याला.तू घाबरू नको.बंद घरातून तो कसा पाहू शकेल आपल्याला." ती हलकीशी हासली.
"खरं यार.. तो कसा येईल." मी इकडं तिकडं पाहिलं.कुणी आम्हाला पहात तर नाही ना? याची खात्री केली.
" कुणी नाही पहात आपल्याला.इतक्या रात्री कोण जाग असतं? पण तुला आवडेल ना मी इथं,असं आलेले."
" का नाही?"
"बाय..बाय.. भेटू पुन्हा." ती हासत हासत निघून गेली. ती सुंदर तर दिसतंचं होती पण त्या पेक्षा ती सेक्सी दिसत होती.
ती रात्री यायची आणि आम्ही गप्पा मारायचो.ती तिच्या आयुष्याच्या गोष्टी सांगायची.कधी हसत,कधी उदास होत.मला ही तिची सवय लागली.तिचं हसणं, तिचा आवाज, तिचे डोळे...मी तिच्या प्रेमात पडलो होतो पण ती नेहमी म्हणायची, "पराग, मला फक्त तुझी मैत्री हवी आहे.मित्र म्हणून तू मला हवा आहेस. फक्त मित्र.!!"
"माझं काय चुकलं का? तू अशी का बोलतेस?"
"तुम्ही पुरुष सारे सारखेच असतात. स्त्री दिसली की लगेच लाळघोटेपणा करायला सुरू करतात.थोडसं बोललं,हासलं की तसलीच समजतात.तुझ्यात वासना उत्पन्न होऊ लागली आहे.खर ना हे? पण साॅरी मी माझं शरीर तुला कधीच देऊ शकत नाही.तसं ते अशक्यच आहे."
"असं काही नाही.तुझा गैरसमज होतोय. वासना कसले निर्माण होते."
" का तू पुरूष नाहीस?"
"असं कसं बोलतेस?"
" वासना प्रत्येक जीवात असते. तू तर पुरूष आहेस. वासना तर असणारचं ना? वासना हिन जग असू शकत का? तू खोटं बोलू नकोस... तुझी नजर कुठे आहे हे मी हेरलयं.तुला सांगितले ना आम्हा बायांना पुरूषी नजरा लगेच कळतात."
"तुला वाटत असेल पण नक्कीच... तसा नाही मी."
"मी तरी कुठं तशी होते पण नवरा माझा संशय खोर. नुसता डाऊट घ्यायचा तो माझ्यावर."
"आता नाहीत का ते?"
"आहे ना नाईट ड्यूटीला जातो.तो वेळ देत नाही मला. दुस-याला थोडं बोललं,तरी.त्याला डाऊटं.एका स्त्रीचं व पुरूषाचं पवित्र नातं असू शकत नाही का?"
"असू शकत.समाजाला ते मान्य होत नाही.लोक काही तरी वेगळचं समजत राहतात."
"समाज मान्य करेल असं मैत्र जपायचं आपल्याला.चालेल ना तुला? मी तुझी मैत्रीण.. तू माझा मित्र." खरतर मी हात पुढे करून तिचा हात हातात घ्यायचा प्रयत्न केला.ती मागे सरकली
"नो.. प्लीज.डोन्ट टच मी " तिनं सुरक्षित अंतर घेतलं.
"मला चालेल की तुझ्यासारखी सुंदर मैत्रिण कुणाला नको?"
"हे बरं... तुम्हा पुरुषांना मैत्रीण पण सुंदरच हवी असते."
"आणि तुला..??
"फक्त तू..!! " ती हासत निघून गेली.तिच्या त्या मोहक हसण्यात बाय.बाय चा संकेत होता.फक्त तू हे शब्द माझ्या मनात कसले,तरी धुंद सूर छेडून गेले होते.
रात्रीचं ती येई. बसे गप्पा मारी.दिवसा कधी मला ते घर उघड दिसलं नाही.ती ही कधी दिसली नाही.तिचा नवरा तिचा,छळ करतो हे तिनं अनेकादा मला सांगितल होतं.मला राग ही येई त्याचा.तो नक्की मूर्खच असणार इतक्या सुंदर बायकोला कुणी छळत का? तो कधीच मला दिसला नाही. मी ही कधी त्याचा शोध घेतला नाही. सुंदर,आणि फ्रॅक्चर शेजा भेटली म्हणून मी ही खूश होतो.
एके दिवशी संध्याकाळी मी अपार्टमेंटच्या पायऱ्यांवर बसलो होतो.शेजारी राहणारे पांडव काका वयस्कर आणि गप्पिष्ट आहेत. ते माझ्याजवळ आले. त्यांच्या हातात नेहमीची सिगारेट होती.
"हे घर कायम बंद का असते?" मी काकाला सहज विचारले.
"मॅनेजर रमेशचं घर आहे ते.तो त्याच्या सुंदर बायकोसोबत इथे राहायचा.तिचं नाव सावित्री होतं पण गडी फार संशयखोर होता.त्याला तिच्यावर संशय आला आणि..." ते थांबले.
"मग काय झालय?"
"दोन वर्षांपूर्वी त्याने तिला मारून टाकलं.तिनं फाशी घेतल्याचा बनाव केला.आता बसला जेलात जाऊन खडी फोडतं.
"त्याच्या बायकोचं काय नाव होतं ?"
"सावित्री...!! नावासारखीच सुशील होती पण हा डाऊटखोर होता."
माझ्या अंगाचा घामाघूम झाला.सावित्री? माझी सावित्री? जी मला रोज भेटते.जी माझ्याशी गप्पा मारते.जी माझ्या प्रेमात आहे... साॅरी..!! आम्ही फ्रेंडशिप मध्ये आहोत.ती दोन वर्षांपूर्वीच मेली?
माझ्या डोक्यात विचारांचं काहूर माजलं. मी ज्या मुलीशी बोलतो,ती सावित्री आहे... आणि ती भूत आहे? मी उठलो.माझे हात पाय थरथरत होते. माझं वर घरात जाण्याचं धाडस होत नव्हतं.आज रात्री रूमवर थांबणं शक्य नव्हतं.भूत या गोष्टीवर माझा विश्वास नव्हता पण भितीने मनात कब्जा केला होता. #कथाआणिव्यथा
त्याचं दिवशी मी रूम सोडली.नवीन जागी गेलो पण सावित्री मला विसरता येत नाही. रात्री मला तिचा आवाज ऐकू येतो. "पराग... तू मला वचन दिलंस..." मी झोपेतून दचकून जागा होतो.माझ्या नवीन खोलीच्या गॅलरीत ती उभी आहे असा भास होतो आणि रात्री जेव्हा वारा सुटतो, तेव्हा मला वाटतं... ती अजूनही मला पहाते आहे.
समाप्त
परशुराम सोंडगे,बीड
टिप्पण्या