ना.धो.महानोर: रानकवी

  श्रध्दांजली...!!!

तोडुन काळीज झोपडी.

प्राण रानात फडफडते.

भिजकी वही वेदनांची

कैवल्य तुम्ह शरण येते.

रानकवी:ना धो महानोर


६० वर्षांपासून निसर्गाशी नातं जोडणारे, बालकवी व बहिणाबाईंचा वारसा समर्थपणे चालविणारे रानकवी ना.धों. महानोर यांचा आज दि. 3 ऑगस्ट स्मृतिदिन.

मराठी काव्यविश्‍वात निसर्गकवी म्हणून महत्त्वाचे स्थान प्राप्त करणाऱ्या महानोरांचा जन्म १६ सप्टेंबर १९४२ ला पळसखेडच्या शेतकरी कुटुंबात झाला. आई-वडील दुसऱ्याच्या शेतात राबत असत. महानोरांना चार भाऊ आणि तीन बहिणी. ते सगळ्यांत थोरले. प्राथमिक शिक्षण पळसखेडला झाल्यानंतर वयाच्या दहाव्या वर्षी ते पुढील शिक्षणासाठी ८-१० कि.मी. अंतरावर असलेल्या शेंदुर्णीच्या शाळेत दाखल झाले. शेंदुर्णीच्या शाळेतच कवितेशी त्यांची ओळख झाली, कवितेची गोडी लागली. शाळेत असताना शाळेच्या नाटकांमधून त्यांनी कामंही केली. मॅट्रिक झाल्यानंतर ते जळगावच्या मूळजी जेठा महाविद्यालयात कला शाखेत दाखल झाले. या महाविद्यालयात म. ना. अदवंत, राजा महाजन अशा ‘साहित्यिक’ प्राध्यापकांकडून महानोरांना भरपूर प्रोत्साहन मिळालं, परंतु घरातल्या अडचणींमुळे वर्ष पूर्ण होण्याच्या आतच शिक्षण सोडून त्यांना गावी जाणं भाग पडलं. त्यांच्या वडिलांनी स्वत:ची पाच एकर कोरडवाहू जमीन विकत घेतली होती आणि शेतीच्या कामांसाठी वडिलांना त्यांची गरज होती. महानोरांचं शिक्षण थांबलं आणि ते शेतीत रमले. इथेच त्यांच्या काव्यप्रतिभेला बहर आला. आपल्या अद्भुत निसर्गकवितांनी, त्यातल्या रंग-गंधांनी, नदीच्या प्रवाहासारख्या नाद-लयींनी त्यांनी वाचक-रसिकांना वेड लावलं.  रानात राहणारा हा कवी शब्दांच्या माध्यमातून निसर्गाची भाषा बोलायचा, निसर्गाशी संवाद करायचा, रसिकाचं बोट धरून त्यांना निसर्गात घेऊन जायचा. निसर्ग आणि स्त्री ही महानोरांच्या कवितेची केंद्रस्थानं होती. त्यांच्या कवितेत निसर्गाचे विविध गंध, विविध ध्वनी सोबत, निसर्गाच्या स्पर्शाने फुललेला व रोमांचित करणारा शृंगार होता. 

अजिंठ्याला पुरातनकालीन सभ्यता सांगणारे चिरकालीन शिल्प आहे. याच अजिंठ्याच्या पायथ्याशी वसलेले पळसखेडे या छोट्याशा गावात  महानोरांनी आपल्या अक्षरांनी असेच चिरस्मरणीय शिल्प घडविले. पळसखेडची लोकगीते त्यांनी जिव्हाळ्याने संकलित केली. ही ‘पळसखेडची गाणी’ त्यांनी आईला अर्पण केली. या अर्पणपत्रिकेत मिताक्षरांत महानोर सांगून जातात ः

आईसाठी

तुझी पुण्याई माझ्या शब्दांना सायीसारखी

– या शब्दांना स्पष्टीकरणाची आवश्यकता नाही. आईविषयीची कवीची कृतज्ञतेची भावना ओथंबून आलेली. ‘रानातल्या कविता’मध्ये १९६० ते १९६६ मधील चौसष्ट कविता आहेत. त्यांना शीर्षके नाहीत. या सगळ्या कवितांत संपृक्त आशयाने भरून आलेले कविमन हे रान झालेले आहे. यातील पहिला उद्गार स्व-हस्ताक्षरामधून आलेला आहे ः

ह्या शेताने लळा लाविला असा असा की,

सुखदुःखाला परस्परांशी हसलो-रडलो.

आता तर हा जीवच अवघा असा जखडला

मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो

ही कवीच्या अंतरात्म्यातील मंत्राक्षरे आहेत. एकदा का ती मर्मदृष्टीने समजून घेतली तर त्याच्या कवितेची कळ आकळते. त्यांच्या प्रतिभेचा सर्वांगस्पर्श या सर्व कवितांना झालेला आहे. महानोरांचे आपल्या भूमीविषयीचे उत्कट ममत्व, कृषिजीवनाविषयीचा जिव्हाळा, या दोहोंशी एकरूप होता होता निःसीम निष्ठेने केलेली अक्षरसाधना, त्यातून निर्माण झालेली अनोखी प्रतिमासृष्टी आणि उत्कट प्रेमानुभूतीचे विभ्रम या सर्वांच्या संयोगाने त्यांची काव्यसृष्टी फुली फुलून आली होती.

‘रानातल्या कविता’मधील कवितेत प्रारंभीच महानोर उद्गारतात ः

ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे

आणि ह्या मातीतुनी चैतन्य गावे

कोणती पुण्ये अशी येती फळाला

जोंधळ्याला चांदणे लखडून जावे.

कृषिसंस्कृतीतील समृद्धी पाहून कविमनात असीम सुखाच्या लडीमागून लडी उलगडल्या जातात. अटळ आशय मग अभिव्यक्त होतो. या कवितेत मातीशी जडलेली नाती आहेत, त्यातल्या वेदना-संवेदना आहेत. महानोरांची उत्कट अभिव्यक्ती रोमँटिक-भावनिक वळणाने जाते. महानोरांनी गद्य लेखनही भरपूर केलं आहे. ‘गांधारी’ ही कादंबरी, ‘गपसप’ व ‘गावाकडच्या गोष्टी’ हे लोककथांचे संग्रह, ‘ऐशी कळवळ्याची जाती’ हा व्यक्तिचित्रणात्मक ललित लेखांचा संग्रह असं विविधांगी ललित लेखन त्यांच्या नावावर आहे. याशिवाय ‘यशवंतराव चव्हाण यांचे मौलिक विचार’, ‘शरद पवार आणि मी’ तसेच ‘आनंदयोगी पु.ल.’ या पुस्तकांमधून त्यांनी महाराष्ट्रातील ही मोठी व्यक्तिमत्त्वं उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात, महानोरांचं पहिलं प्रेम कवितेवरच आहे. ‘रानातल्या कविता’ या त्यांच्या पहिल्याच कवितासंग्रहाने मराठी कवितेत त्यांचं महत्त्वाचं स्थान निर्माण केलं. त्यांचे ११ कवितासंग्रह व ‘अजिंठा’ हे खंडकाव्य प्रकाशित आहे. खान्देशातील लोककला असणारे वहीगायनाविषयी त्यांना विशेष आत्मीयता होती. ‘वही’ आणि ‘पळसखेडची गाणी’ हे त्यांच्या लोकगीतांचे संग्रह आहेत. त्यांनी चित्रपटांसाठी गाणी लिहिली आहेत. ‘जैत रे जैत’ या चित्रपटात त्यांच्या कविताच गाण्यांच्या रूपाने आविष्कृत झाल्या आहेत. महानोरांचं लोकसाहित्याबद्दल प्रचंड प्रेम व जिव्हाळा आहे. या प्रेमापोटी त्यांनी आपल्या भागातील लोकगीतं व लोककथा शोधून, एकत्रित करून संग्रहरूपाने त्यांचा परिचय महाराष्ट्राला घडवला आहे. यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले. ‘वही’ हा  लोकप्रिय असलेला लोकगीतांचा प्रकार. महानोरांनी लिहिलेल्या ‘वह्या’ त्यांच्या ‘वही’ या संग्रहात आहेत.

‘चांद केवड्याची रात आलीया सामोरा

राजा माझ्या अंबाड्याला बांधाया गजरा’

अशी भावुक, मधाळ शब्दकळा लाभलेल्या ‘वही’चं राजस रूप असं आहे,

‘राजसा... जवळि जरा बसा

जीव हा पिसा तुम्हाविण बाऽईऽ

कोणता करू शिणगार सांगा तरि काऽही!’

विलक्षण लयकारी लाभलेल्या या कवीने मुक्तछंदही भरपूर लिहिला आहे. ‘प्रार्थना दयाघना’ मुक्तछंदात आहे, ‘अजिंठा’तली गिल-पारूची कथा मुख्यत्वाने मुक्तछंदात आहे आणि ‘तिची कहाणी’सुद्धा. महानोरांच्या कवितेचे असे विविध पैलू आहेत. १९७८ साली ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य झाले. मराठी साहित्य परिषदेच्या वतीने पुण्यात झालेल्या पहिल्या पर्यावरणप्रेमी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. इतकेच नाही तर दशदिवसीय ई-साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.

 किडनीच्या आजाराने त्रस्त असणाऱ्या महानोर यांना जुलै 2023 मध्ये प्रकृती ढासळल्याने व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र पुण्यातील रुबी हॉस्पीटलमध्ये उपचारादरम्यान दि. ३ ऑगस्ट २०२३ सकाळी या रानकवीने आपला अखेरचा श्वास घेतला. भावपूर्ण श्रध्दांजली!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

युध्द पेटले आहे – जगण्याचा चंग आणि संघर्षाच्या गर्जना करणा-या माणसांच्या कविता.

धर्मयोगिनी अहिल्यादेवी- आजच्या पिढीला मूल्यांचा आरसा दाखवणारं पुस्तक

जत्रातील प्रेमाची गाेष्ट