मृत्यूला जराशी थांबवणारे डाॅ.दिवाकर गुळोजकर

मृत्यूला जराशी थांबवणारे डाॅ.दिवाकर गुळोजकर 

Dr.Diwakar Gulojakar


मरण कुणाला चुकलं नाही.मरणाच्या हजारो वाटा असतात.मृत्यू शेवटी जीवाला गाठतोचं.काही माणसं आसतात एखाद्या जीवाला मृत्यूच्या जबड्यातून सोडवणारे. त्या काळाला पण ठणकावून सांगणारे "जरा थांब रे..!!!" 

असतं काही माणसात सामर्थ्य.असेच सामर्थ्य असलेले डाॅक्टर होते दिवाकर गुळोजकर. त्यांच्या निधनाची बातमी ऐकली.अनेक आठवणी उचंबळून आल्या. त्या आठवणी पापण्या ही ओल्या करून गेल्या.

2003 ची घटना आहे.आमच्या आण्णांला म्हणजे वडीलांना त्यांनी मृत्यूच्या दारातून ओढून काढले होते.ठणठणीत बरे ही केले होते.आण्णाला असेच बीड मध्ये एका नामवंत डाॅक्टरच्या हाॅस्पीटल मध्ये आटमीट केलं होतं.ते नामवंत ही होते आणि सिव्हीलमध्ये वैद्यकीय अधिकारी ही होते.

आम्ही त्यांच नाव ऐकून त्या हाॅस्पीटल मध्ये गेलेलो.मला भेटलेले ते एक मूर्ख व घंमेडी डाॅक्टर होते.आण्णांच्या तब्येतीत सुधारणा करण्याऐवजी त्यांनी त्यांना बेशुद्ध केले. आण्णा गंभीर झाल्यानंतर तुम्ही त्यांना घेऊन जाऊ शकता असा सल्ला ही दिला.भरमसाठ बील ही हातावर ठेवलं .

आण्णा बेशुद्ध झाले असले तरी त्यांचा ताप कमी होत नव्हता. शेवटचा पर्याय म्हणून मला एका स्नेहीने फिनिक्स हाॅस्पीटल मध्ये डाॅक्टर दिवाकर गुळोजकर यांना भेटण्याचा सल्ला दिला.मी फक्त रिपोर्ट घेऊन त्यांना भेटलो.आण्णांना फार हालचाल सहन होणं शक्य नव्हतं.Dr.Diwakar Gulojakar

 त्यांनी प्रथम मला आधार दिला.जो मला लाखमोलाचा होता.रिपोर्ट नुसार तर फार काही गंभीर बाबी नाहीत.मला रूग्ण तपासावा लागेल. असं सांगितलं .झालं. रूग्ण तपासला.सहा तासात तुमचा रूग्ण बरा करतो. ही माझी गॅरंटी समजा. शक्यतेच्या भाषेत बोलणारे डाॅक्टर डायरेक्ट गॅरंटी देतात.हा आम्हाला सुखद धक्का होता.असं हमीवजा कोणताचं डाॅक्टर बोलत नाही. डाॅक्टर गुळोजकरांचा काॅन्फडीन्स अफलातून होता.झालं.सहा तासात आण्णा शुध्दीवर आले.बोलू लागले. मी भेटून डाॅ.दिवाकर गुळोजकरांना कृतज्ञ भाव व्यक्त केला.

त्या अनुभवी नामवंत डाॅक्टर व सिव्हील मध्ये नोकरी करून हाॅस्पीटल चालवणा-या डाॅक्टरला बारा दिवसात जमले नाही ते डाॅक्टर गुळोजकरांना काही तासात का जमले असेल? मी विचार करत होतो.

मी डाॅक्टर गुळोजकरांजवळ त्या नामवंत डाॅक्टर विषयी संताप व्यक्त केला.ते एवढच बोलले." चुकू तर कुणी शकत ना? मी ही कधीच चुकणार नाही, असं नाही..? तुमचे वडील बरे होताहेत ही किती मोठी गोष्ट घडते आहे. बी रिलॅक्स..!!" हसून पाठीवर थोपटून ते निघून गेले. आपुलकीने व विश्वासाने डाॅक्टर गुळोजकर यांनी मोठं सामर्थ्य मिळवले होते. 

जेव्हा केव्हा आण्णा आजारी पडत तेव्हा ते मला डाॅक्टर गुळोजकर यांच्याकडेच जाण्याचा आग्रह करतं. त्यांन बरे ही वाटे.मी ही अनेकदा उपचार घेतले डाॅक्टराकडून. 

हा लेख लिहीताना एक प्रसंग माझ्या डोळ्यासमोरून हालतच नाही.

"ही बीडच्या गुळोजकर डाॅक्टरची गोळी आहे.तुम्हाला बरे वाटेल "असं म्हणून मी आण्णाला शेवटच्या दिवशी पण एक गोळी दिली होती.त्यांच्या तब्येतीचे गांभीर्य अगदी कठोरपणे डाॅक्टर गुळोजकरांनी आम्हाला समजावले होते.

" बीडच्या डाॅक्टरची गोळी आहे ना?घे इकडे.मी आता नक्की बरा होईल." ती अधाशीपणे आण्णा घेतली.काही तास त्यांची जगण्याची इच्छा अधिक तीव्र झाली.ते बोलत राहिले.परिणाम गोळीचा नक्कीच नव्हता. परिणाम डाॅक्टरांच्या नावाचा होता.Dr.Diwakar Gulojakar

आण्णांवर मृत्यू ने अखेर झडप घातली. मृत्यू कुणालाच चुकला नाही.माझ्या आण्णाला नाही नि डाॅक्टर दिवाकर गुळोजकरांनी ही नाही. आपल्यावर ही तो असाच झडप घालणारच आहे. त्याच्या तावडीतून कोणताच जीव सुटणार नाही. जेव्हा जेव्हा मी कोणत्याही रूग्णालयची पायरी चढतो तेव्हा डाॅक्टररची दोन रूपे कायम मला आठवतात.एक तो नामवंत सरकारी पैसे लुटून रूग्णाचं शोषण करणारा क्रूर व मूर्ख डाॅक्टर व आपुलकीनं सेवा व विश्वास देणारे डाॅक्टरातील देव असणारे दिवाकर गुळोजकर..!!!

डाॅक्टर,मृत्यूने अशात नको होत तुम्हाला हिरावून न्यायला.

अजून तुमची अनेकांना गरज होती पण नियतीला काय करायचं? ती फारच क्रूर असते ना?

डाॅक्टर साहेब, जड अंतःकरणाने भावपूर्ण श्रध्दांजली..!!

  परशुराम सोंडगे,बीड

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धर्मयोगिनी अहिल्यादेवी- आजच्या पिढीला मूल्यांचा आरसा दाखवणारं पुस्तक

युध्द पेटले आहे – जगण्याचा चंग आणि संघर्षाच्या गर्जना करणा-या माणसांच्या कविता.

एका काॅलगर्लची डायरी - भाग 1