संजय गायकवाड: लोकशाहीचा 'चांगभलं' की सत्तेचा उन्माद? राजकीय प्रवृत्तीचा सडेतोड वेध
संजय गायकवाड: लोकशाहीचा 'चांगभलं' की सत्तेचा उन्माद? राजकीय प्रवृत्तीचा सडेतोड वेध
प्रस्तावना:
महाराष्ट्राचे राजकारण हे नेहमीच सुसंस्कृत आणि वैचारिक मतभेदांचा आदर करणारे राहिले आहे. परंतु, अलीकडच्या काळात ही परंपरा पुसली जात असल्याचे चित्र दिसत आहे. आमदार संजय गायकवाड यांनी अलीकडेच केलेले विधान आणि त्यानंतर मागितलेली माफी, हे केवळ एक राजकीय नाट्य नसून ती एका विशिष्ट 'प्रवृत्ती'ची नांदी आहे. ही प्रवृत्ती लोकशाहीसाठी घातक तर आहेच, पण ती महाराष्ट्राच्या वैचारिक परंपरेला लागलेली कीड आहे.Sanjay Gaikwad Controvers
१. माफी की सत्तेचा अहंकार?
जेव्हा एखादा लोकप्रतिनिधी माफी मागतो, तेव्हा त्यात नम्रता आणि पश्चात्ताप अपेक्षित असतो. मात्र, गायकवाड यांनी मागितलेल्या माफीतही एक प्रकारचा 'माज' आणि 'खाज' स्पष्टपणे जाणवत होती. त्यांच्या शब्दांतून व्यक्त झालेली ती 'गाज' हे सिद्ध करते की, ही माफी मनापासून आलेली नसून केवळ प्रकरण अंगाशी येतेय हे पाहून केलेली एक 'राजकीय सोय' आहे. सत्तेची गुर्मी जेव्हा कायद्याच्या कचाट्यात सापडते, तेव्हा ती कशी वितळते, याचे हे उत्तम उदाहरण आहे.
२. 'शिवाजी कोण होता?' – वादाची किनार आणि सत्तेचा गैरवापर
'शिवाजी कोण होता?' या शीर्षकावर चर्चा होऊ शकते, शास्त्रोक्त वादविवाद होऊ शकतात. लोकशाहीत प्रत्येक विचाराला जागा आहे. पण चर्चेच्या नावाखाली ज्या पद्धतीचे 'शब्दभंडार' संजय गायकवाड यांनी खुले केले, त्याचे समर्थन कोणताही सुसंस्कृत समाज करू शकत नाही. दुर्दैवाची गोष्ट अशी की, या प्रवृत्तीचा निषेध होण्याऐवजी काही 'संधीसाधू टोळ्या' त्यांच्या समर्थनार्थ पुढे आल्या आहेत. ही 'लाभार्थी टोळी' लोकशाही मूल्यांपेक्षा स्वतःच्या 'कंपूशाही'ला जास्त महत्त्व देते.
३. ही व्यक्ती नाही, तर एक प्रवृत्ती आहे!
संजय गायकवाड यांच्याकडे केवळ एक व्यक्ती म्हणून पाहून चालणार नाही. ते महाराष्ट्राच्या गलिच्छ आणि संधीसाधू राजकारणाने पोसलेले एक प्रतीक आहेत. ही प्रवृत्ती लोकशाहीच्या मूल्यांना पायदळी तुडवून सत्तेचा माज मिरवते. स्वतःला जनतेचा सेवक (आमदार) समजण्याऐवजी हे लोक स्वतःला एखाद्या संस्थानाचे 'जहागीरदार' समजू लागले आहेत. हीच ती विकृती आहे जी आपल्या लोकशाहीच्या बोकांडी बसली आहे.Maharashtra Politics',
४. वाचन, वास्तव आणि विपर्यास
१९८८ साली प्रसिद्ध झालेले पुस्तक या महाभागांना इतक्या वर्षांनंतर आता दिसले, यावरूनच त्यांच्या अभ्यासाची झेप लक्षात येते. लेखक आणि प्रकाशक यांच्यातील मूलभूत फरक ज्यांना समजत नाही, त्यांच्याकडून इतिहासाच्या योग्य आकलनाची अपेक्षा करणे म्हणजे मूर्खपणा आहे. पण त्यांना हे समजून घेण्याची गरजही वाटत नाही, कारण सत्तेच्या बळावर 'क्लीन चीट' मिळवण्याची खात्री त्यांना असते.
- 'Sanjay Gaikwad Speech'
५. लोकशाहीचे 'चांगभलं' होणार का?
आज सामान्य नागरिक तक्रार, कायदा, न्यायालय आणि न्यायाच्या प्रतिक्षेत आयुष्य घालवतो. दुसरीकडे, अशा प्रवृत्ती कायद्याला वाकुल्या दाखवत उधळत राहतात. जर आपण या प्रवृत्तींचा वेळीच निषेध केला नाही, तर हा माज असाच वाढत जाणार आहे. मग शेवटी आपल्या हातात फक्त एकच गोष्ट उरेल – "चांगभलं...!!! लोकशाहीचं चांगभलं...!!!"
परशुराम सोंडगे,बीड


टिप्पण्या