राधा आणि भागवत पुराण: अप्रत्यक्ष उल्लेखाचे गूढ

राधा आणि भागवत पुराण: अप्रत्यक्ष उल्लेखाचे गूढ

भागवतात राधेचा उल्लेख"








राधा कृष्ण हिंदू धर्मात महत्वाची देवी देवता आहेत.राधा व कृष्ण यांच प्रेम अतुट होतं.तसं मानलं जात.

अनेक ठिकाणी राधाकृष्णाची मंदिरे आहेत 

अनेक उत्सव ही राधा व कृष्ण या नावाने साजरे करतात 

राधा तत्व हे फार महत्वाचं तत्व आहे असं मानलं जातं.

कृष्णाच्या सदैव ह्रदयात वास असलेली कोण असेल तर ती आहे राधा? श्रीकृष्ण चरित्र हे राधेशिवाय पूर्ण कसे होऊ शकत? आपण चरित्र म्हणतो पण राधेशिवाय कृष्णचं कसा असू शकतो? असे भक्त म्हणतात.मानतात.

 इतक सारं असताना ही श्रीकृष्ण चरित्राचा महत्वाचा पौराणिक संदर्भ असलेल्या भागवत ग्रंथात मात्र राधेचा उल्लेख नाही. का?

श्रीमद् भागवत पुराणात राधेचे नाव स्पष्टपणे घेतलेले नाही तरीही तिच्या अस्तित्वाची साक्ष पुराणकार साकल्याने देतात.भागवताच्या दशम स्कंधात (१०.३०.२८) गोपिकांच्या मुखातून एक ओळ निघते:

 “अनयाराधितो नूनं भगवान् हरिरीश्वरः”

 “निश्चितच या एका गोपीने भगवान श्रीहरींची पूर्ण आराधना केली आहे, म्हणून ते इतर सर्व सोडून तिच्याकडे एकांतात गेले.” 

वैष्णव आचार्य विश्वनाथ चक्रवर्ती, जीव गोस्वामी यांनी या ओळीत ‘आराधिता’ शब्दातून राधेच्या नावाची गूढ उपस्थिती दाखवली आहे. अनेक जण म्हणतात राधा हे काल्पनिक पात्र आहे पंरतु अराधना हे नाव जे भागवतात येते. ती राधा आहे असं अनेक विद्वानांचे मत आहे.ही अप्रत्यक्ष उल्लेख राधेला भागवतातील रासलीलेच्या केंद्रस्थानी ठेवतो. रासलिला हे भागवतात महत्वाचं प्रकरण आहे.

संपूर्ण भागवतात ही राधेचा उल्लेख करण्यात आला नाही.रास लिला ही एक शृंगार रसाने ओतप्रोत भरलेले प्रकरण आहे. भागवतामध्ये रासलिला हे प्रकरण वाचताना आपल्याला कुणीतरी अशी एक गोपी आहे ती कृष्णाची खास आहे हे जाणवत राहते पण राधेचा उल्लेख मात्र नाही. जेंव्हा पुराणाचा चिकित्सक अभ्यास सुरू झाला.तेव्हा अनेक तर्क लावण्यात आले त्यामुळे अनेक संभ्रम राधे विषयी तयार झाले.भागवत पुराणात राधा"

सर्वांत प्रमुख कारण म्हणजे श्री शुकदेव महाराज स्वतः राधाराणीचे अत्यंत प्रेमळ भक्त होते.ते ‘लीला-शुक’ म्हणून ओळखले जातात. वैष्णव परंपरेनुसार, राधेचे नाव उच्चारले की त्यांची भाव समाधी लागे. त्यांना निर्‍विकल्प समाधी प्राप्त होई आणि ती समाधी महिनोन्‌मही चालू राहू शकेल व राजा परीक्षितांना केवळ सात दिवसांचा अवकाश होता. या अल्पावधीत पूर्ण भागवत कथन करणे आवश्यक होते.जर शुकदेवांनी ‘राधा’ हे नाव घेतले असते,तर त्यांची समाधी लागली असती आणि कथा अपूर्ण राहिली असती. म्हणून त्यांनी अप्रत्यक्ष उल्लेख केलेले आहेत.असं भागवतामधूये विशद केले आहे. राधेचा उल्लेख भागवतात नाही असं म्हणणं चुकीचे आहे.अप्रत्यक्ष उल्लेख जरी असला तरी उल्लेख नाहीच असं नाही. राधेचा अप्रत्यक्ष उल्लेख करण्याचा हेतू काही असला तरी राधेचा उल्लेख टाळला आहे हे नक्की.भागवतात राधेचा उल्लेख"

राधेचे वैभव खऱ्या अर्थाने फुलले ते जयदेवाच्या गीत गोविंद (१२वे शतक) या अमर काव्यात. या ग्रंथात राधा ही कृष्णाची विरहव्याकूळ प्रेयसी आहे, जी प्रेमाच्या सर्वोच्च शिखरावर विराजमान आहे. जयदेव राधेला कृष्णापेक्षा श्रेष्ठ स्थान देतात जिथे कृष्ण राधेच्या चरणी नतमस्तक होतात. “राधा-माधवयोः प्रेम-लीला” ही संकल्पना गीत गोविंदमुळे भारतीय साहित्य आणि भक्तिमार्गात अमर झाली.

ब्रह्मवैवर्त पुराण (प्रकृति खंड) राधेला मूलप्रकृति आणि कृष्णाची नित्य सखी म्हणून वर्णित करते. येथे ती लक्ष्मीची अवतार असल्याचे सांगितले आहे. पद्म पुराण, स्कंद पुराण, नारद पुराण आणि गर्ग संहिता यांमध्येही राधा-कृष्णाच्या दिव्य प्रेमाची विस्तृत कथा आली आहे.गर्ग संहितेत तर त्यांच्या बाललीला आणि विवाहाचे सुंदर वर्णन आहे.

राधा ही साधारण गवळण नव्हती. ती वृषभानु महाराजांची कन्या, तर काही परंपरेनुसार तिचा जन्म गोलोकात कृष्णासोबतच झाला. तिचे प्रेम परकीय प्रेम होते

सामाजिक बंधनांपलीकडे जाणारे.कृष्णाशी तिचे नाते विवाहबद्ध नव्हते,तरीही ते नित्य आणि दिव्य होते.हा विरह आणि मिलनाचा खेळच भक्तीचा उच्चतम मार्ग दाखवतो.जेव्हा कृष्ण मथुरेला जातात, तेव्हा राधेचा विरह इतका तीव्र असतो की, त्या विरहातूनच संपूर्ण भक्तिमार्ग जन्माला येतो.भागवतात राधेचा उल्लेख"

गीत गोविंद मधील एक ओळ राधेच्या मनःस्थितीला स्पर्श करते:

“राधिका तव विरहेण सखि...” हे विरहाचे गाणे केवळ शब्द नव्हेत तर आत्म्याचा पुकार आहे. राधा प्रतीक्षा आहे,ती व्याकूळता आहे,ती पूर्ण समर्पण आहे.

आधुनिक भक्तिमार्गात, विशेषतः गौडीय वैष्णव परंपरेत, राधा ही कृष्णाची स्वरूप-शक्ति मानली जाते. कृष्णाशिवाय राधा अपूर्ण, आणि राधेशिवाय कृष्ण निर्जीव. दोघे मिळूनच पूर्णत्व प्राप्त करतात.

राधा म्हणजे केवळ एक व्यक्ती नव्हे, तर एक भावना आहे. निर्लेप प्रेम, निःस्वार्थ भक्ती आणि अनंत विरहाची मिठी.ती वृंदावनाच्या धुळीत, गोपिकांच्या हास्यात, बासरीच्या स्वरात आणि भक्तांच्या हृदयात सदैव वास करते.

महाचैतन्य प्रभू म्हणतात.राधा ही नाव नव्हे,ती एक अवस्था आहे.

ज्याने त्या अवस्थेचा स्पर्श केला, त्याला कृष्णाचे दर्शन सहज होते.

हीच राधा पुराणांच्या पानांवर, काव्यांच्या ओळींवर आणि प्रेमाच्या अनंत आकाशात विराजमान आहे.आज उदात्त प्रेमाची प्रतिक म्हणून राधा कृष्णाला मानलं जातं.

                         परशुराम सोंडगे,बीड


 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एका काॅलगर्लची डायरी - भाग 1

युध्द पेटले आहे – जगण्याचा चंग आणि संघर्षाच्या गर्जना करणा-या माणसांच्या कविता.

सत्यवती: एक शापित कुमारी