वैदिक आणि वारकरी

 वैदिक आणि वारकरी


ह.भ.प. ज्ञानेश्वर बंडगर


वेदांचा तो अर्थ आम्हासी च ठावा। येरांनी वाहावा भार माथा॥१॥

खादल्याची गोडी देखिल्यासी नाही। भार धन वाही मजुरीचे॥२॥

उत्पत्तिपाळणसंहाराचे निज। जेणे नेले बीज त्याचे हाती॥३॥

तुका म्हणे आले आपण चि फळ। हातोहाती मूळ सापडले॥४॥


हिंदू समाजात गेल्या हजारो वर्षांपासून दोन विचारप्रवाहांचा सतत संघर्ष चाललेला आहे. त्यातील एक विचारसरणी वैदिक आहे तर दुसरी विचारसरणी समतावादी आहे. वैदिक धर्मविचार सतत वर्णाश्रमाचा, यज्ञादी हिंसक कर्मकांडाचा, जातिविषमतेचा आणि वेदप्रामाण्याचा पुरस्कार करत आला आहे. या वैदिक धर्माला विरोध करत जैन - बौद्धादी श्रमणधर्मांनी सामाजिक समतेचा पुरस्कार केला. स्त्रिया आणि शूद्रातिशूद्रांचा कैवार घेतला. पुढच्या काळात वारकरी संप्रदाय हा प्रचलित वैदिक धर्माविरुद्ध बंड करत उभा राहिला. वारकरी संप्रदायाने सामाजिक समतेची बाजू लावून धरली. मुळात या संप्रदायाची उभारणीच स्त्रिया आणि शूद्रातिशूद्र प्रवर्गातून आलेल्या संतांनी केलेली होती. साहजिकच वैदिक वर्णाश्रम धर्म आणि वारकरी संतांचा मूल्यविचार यात मूलभूत फरक आहे. वैदिक वर्णाश्रम धर्मामुळे हिंदू समाज जातीपातीत विभागला जाऊन कमजोर झाला. समाजातील बहुतांश वर्ग शूद्रातिशूद्र गणला गेला आणि तो उच्चवर्णीयांच्या मानसिक गुलामगिरीत अडकला. स्त्रियांकडे केवळ उपभोगाची वस्तू म्हणून पाहिलं गेलं. कर्मकांडाने उचल खाल्ली. नेमक्या याच काळात समतावादी वारकरी विचार उदयाला आला.


वैदिक वर्णाश्रम धर्मविचारात आणि वारकरी मूल्यविचारात काही मूलभूत फरक आहेत. त्यातील काही फरक आपण समजून घेतले पाहिजेत. 


वैदिक धर्म - जन्माधिष्ठित विषमतेचा आणि वर्णाश्रमाचा पुरस्कार करतो.

वारकरी संप्रदाय - विषमता नाकारुन समतेचा पुरस्कार करतो. 


वैदिक धर्म - रोटीबंदी म्हणजे आंतरजातीय सहभोजन मान्य नाही. 

वारकरी संप्रदाय - गोपाळकाल्याच्या माध्यमातून आंतरजातीय सहभोजनाचा पुरस्कार करतो.


वैदिक धर्म - शूद्रातिशूद्रांनी उच्चवर्णीयांच्या पाया पडावं पण उच्चवर्णीयांनी शूद्रातिशूद्रांच्या पाया पडू नये.

वारकरी संप्रदाय - 'वर्णाभिमान विसरल्या याती। एकमेका लोटांगण जाती रे॥' या न्यायाने वर्णाभिमान सोडून सगळेजण एकमेकांच्या पाया पडतात. 


वैदिक धर्म - स्त्रियांना परमार्थाचा अधिकार नाही.

वारकरी संप्रदाय- 'स्त्रिजन्म म्हणवुनि न व्हावे उदास' या जनाबाईंच्या अभंगाप्रमाणे स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने परमार्थाचा अधिकार आहे अशी भूमिका मांडतो.


वैदिक धर्म - परमार्थिक सद्गुरु करताना शक्यतो उच्चजातीय अथवा समजातीय गुरु करावा पण खालच्या जातीचा गुरु नये अशी भूमिका ठेवतो.

वारकरी संप्रदाय - गुरु करताना जातीपातीचा विचार मान्य नाही. त्यामुळेच परिसा भागवत, बहिणाबाई, मीराबाई अशा उच्चजातीय संतांनीही शूद्रातिशूद्र मानल्या गेलेल्या संतांना गुरु मानलेलं आहे.


वैदिक धर्म - यज्ञयागादी हिंसक कर्मकांड आणि पर्यायाने मांसाहाराची शिफारस करतो.

वारकरी संप्रदाय - अहिंसेचा मूल्यविचार मानतो त्यामुळे शाकाहारी असून यज्ञादी कर्मकांडात होणारी पशुहिंसा अमान्य आहे. त्याचबरोबर यज्ञयागादी कर्मकांडाने चित्तशुद्धी न होता दंभ वाढतो असा वारकरी संतांचा उपदेश आहे. त्यामुळेच 'तीळ जाळिले तांदूळ। काम क्रोध तैसेचि खळ॥' आणि 'योगयागविधी येणे नोहे सिद्धी। वायाची उपाधी दंभधर्म॥' ही संतांची भूमिका आहे. 


वैदिक धर्म - केवळ संस्कृत भाषा हीच देवभाषा आणि धर्मभाषा आहे असं मानतो.

वारकरी संप्रदाय - 'संस्कृत वाणी देवे केली। येर काय चोरापासोनि झाली॥' असा सवाल करत जगातील सर्व भाषा देवभाषा आणि धर्मभाषा आहेत असं मानतो. वारकरी संप्रदाय मराठी असल्यामुळे तो मराठीचा गौरव करतो. 


वैदिक धर्म - ब्राह्मण वर्णाला भिक्षा मागून उदरनिर्वाह करण्याचा अधिकार देतो. 'ब्राह्मणाची मुख्य दीक्षा। मागितली पाहिजे भिक्षा॥' असं मानलं जातं.

वारकरी संप्रदाय- 'भिक्षापात्र अवलंबणे। जळो जिणे लाजिरवाणे॥' असं म्हणत उत्तम व्यवहाराने अर्थार्जन करुन उदरनिर्वाह करण्याची भूमिका मांडतो. 'स्वकष्टार्जित मेळवावा तोचि ग्रासु आपुला।' ही संतांची भूमिका आहे. 


वैदिक धर्म - ब्रह्मज्ञान आणि कर्मकांडाला प्रधान मानतो तर भक्तीला गौण मानतो.

वारकरी संप्रदाय - भक्तीला प्रधान मानतो. 'भक्तिप्रेमसुख नेणवे आणिका। पंडिता वाचका वैदिकांसी॥' असं बहिणाबाई म्हणतात. वैदिकांना भक्तिप्रेमाच्या सुखाचा लाभ कळत नाही. 


वैदिक धर्म - बहुदेवतोपासना स्वीकारतो. वेदात असलेल्या इंद्र, चंद्र, वरुण, सूर्य, आश्विनीकुमार अशा वैदिक देवता मानतो. 

वारकरी संप्रदाय - विठ्ठल या एकाच देवाची उपासना करतो आणि इतर वैदिक देवतांची उपासना निषिद्ध मानतो. 'आता आणिकही संप्रदाये। माते नेणती समवाये। इंद्र सूर्य सोमाये। म्हणोनी यजिती॥' असं सांगून माऊलींनी इतर वैदिक देवतांची उपासना नाकारली आहे. 


वैदिक धर्म - वेद - वेदांतावर भर देतो आणि गीता - भागवताला गौण मानतो. त्यामुळेच वैदिक घरातील कचेश्वर भट ब्रह्मे यांना गीता चोरुन वाचावी लागली. गीता उघडपणे वाचण्याची परवानगी कट्टर वैदिक घरात नव्हती. 'चोरोनिया भावे गीता पाठ केली।' असं कचेश्वर म्हणतात. वेदाचा अधिकार मर्यादीत आहे तर गीतेचा अधिकार सर्वांना आहे. त्यामुळेच वैदिक धर्मात गीता गौण मानली गेली आहे.

वारकरी संप्रदाय- वारकरी संतांनी वेद - वेदांतापेक्षा गीता - भागवतावर भर दिला. 'गीता भागवत करिती श्रवण।' असं तुकोबाराय म्हणतात तर 'भ्याला वेदु गीतेच्या पोटी।' असं ज्ञानोबाराय म्हणतात. वेदाने जे अधिकारभेदाचं पाप केलं होतं ते पाप फेडण्याकरता तो गीतारुपाने प्रकट झाला असं माऊली म्हणतात. 'यालागी मागील उणे। फेडावया गीतापणे। वेदु वेठला भलतेणे। सेव्य होआवया॥' अशी ज्ञानेश्वरीत गीतेची श्रेष्ठता प्रतिपादन करणारी ओवी आहे. वेद हे देवाच्या घोरण्यातून तर गीता जागृतावस्थेत प्रकट झाली त्यामुळे गीता प्रधान मानली गेली आहे. 'जया निद्रिताचा घोरु। हा वेदार्थसागरु। तो स्वंये सर्वेश्वरू। प्रत्यक्ष अनुवादला॥' असं माऊली म्हणतात. 


वैदिक धर्म - वैदिक धर्मात इतर धर्मियांना प्रवेश नाही.

वारकरी संप्रदाय - वैदिक धर्मीयांसह सर्व धर्मीयांना प्रवेश देणारा हा संप्रदाय आहे. त्यामुळेच या संप्रदायात लतिफ आणि शेख महंमदबाबा यांच्यासारखे मुस्लीम धर्मीय संतही आहेत. 


वैदिक धर्म - स्नानसंध्या आणि श्राद्धतर्पणादी कर्मकांड आहे. 

वारकरी संप्रदाय - नामस्मरण भक्तीवर भर आहे. पितर उपासनेचे श्राद्धतर्पणादी कर्मकांड नामंजूर आहे. 


वैदिक धर्म - वेदाचा अर्थ लावताना जातिविषमतेचा पुरस्कार करुन वेदाने भेदाभेदाची शिकवण दिली आहे असं वैदिक धर्म मानतो.

वारकरी संप्रदाय - वेदाचा अर्थ समतावादी विचारांच्या अनुषंगाने लावतो आणि भेदाभेद नाकारतो.


वारकरी संप्रदाय आणि वैदिक धर्मात असे अनेक मूलभूत फरक सांगता येतात. वारकरी संप्रदाय हा निधर्मी नाही आणि वैदिकही नाही. तो सर्व धर्मीयांना सामावून घेणारा हिंदू समाज - संस्कृतीतील एक व्यापक, सर्वसमावेशक आणि समतावादी विचारप्रवाह आहे. 'आम्हा सापडले वर्म। करु भागवत धर्म॥' या उक्तीप्रमाणे तो भागवत धर्माचा भाग आहे. वैदिक धर्मविचार हा हिंदू समाज - संस्कृतीचा भाग असला तरी वर्णाश्रम आणि जातीभेदामुळे तो हिंदू समाजातच फूट पाडणारा आहे तर वारकरी संप्रदाय समतेच्या विचाराने आणि ममतेच्या मार्गाने एकता निर्माण करणारा आहे.


वारकरी संप्रदाय आणि वैदिक धर्मात असलेल्या या फरकाची मांडणी दादा महाराज सातारकर यांच्या परंपरेतील थोर वारकरी अभ्यासक गो. शं. राहिरकर आणि डाॅ. भा. पं. बहिरट अशा अभ्यासकांनी केलेली आहे. तरीही अलीकडच्या काळात वारकरी संप्रदाय हा वैदिक धर्माचाच भाग आहे असं भासवलं जातं. त्यासाठी संतांच्या वेदप्रामाण्य मानण्याच्या अभंग आणि ओव्यांचे दाखले दिले जातात. वास्तविक पाहता संतांनी वेदांना केवळ औपचारिक मान्यता दिली म्हणून ते वैदिक धर्माचा भाग होत नाहीत. वैदिक धर्माने लावलेला वेदांचा अर्थ आणि संतांनी लावलेला वेदांचा अर्थ यात जमीनअस्मानाचं अंतर आहे. आजच्या प्रस्तुत अभंगात तुकोबाराय वेदांचा खरा अर्थ आम्हालाच माहित आहे असं म्हणतात. वास्तविक पाहता तुकोबाराय हे कुणबी जातीतील होते. 'तुका कुणबियाचा नेणे शास्त्रमत।' असं स्वतः तुकोबांनीच म्हटलेलं आहे. 'घोकाया अक्षर। मज नाही अधिकार॥' हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. आता परंपरेने जरी तुकोबांना वेदांचा अधिकार नसला तरी ते वेदांचा अर्थ माहित आहे असं ठामपणे म्हणतात. तुकोबांना वेदांच्या अक्षरांचा अधिकार नसला तरी ते वेद ज्यापासून निर्माण झाले त्या ईश्वराच्या भक्तीच्या बळावर त्यांनी वेदांचा खरा अर्थ लावला. 


तुकोबांनी वेदांचा समतावादी विचारांच्या अंगाने अर्थ लावला. त्याची काही प्रमाणे आपल्याला उपलब्ध आहेत.

१) यातायातीधर्म नाही विष्णूदासा। निर्णय हा ऐसा वेदशास्त्री॥

२) गोब्राह्मणहिता होऊनी निराळे। वेदांचे ते मूळ तुका म्हणे॥

३) अवघी एकाचिच विण। तेथे कैचे भिन्नाभिन्न। वेदपुरुष नारायण। तेणे केला हा निवाडा॥


तुकोबाराय म्हणतात की एकाच ब्रह्मतत्वापासून जग निर्माण झालेलं आहे. आता एकाच तत्वापासून जग निर्माण झालं असेल तर त्या जगातील लोकात आपल्याला भिन्नाभिन्न करता येणार नाही. तुकोबाराय म्हणतात की वेदाचे मूळ हे गोब्राह्मणहिताहून निराळे आहे. संतांच्या काळात 'गोब्राह्मणप्रतिपालन' हा वेदांचा मुख्य गाभा मानला जात होता. वैदिक धर्माने वेदांचा तसाच अर्थ लावला होता. तुकोबाराय मात्र म्हणतात की मूळ वेदात केवळ गोब्राह्मणाच्या हिताची नाही तर प्रत्येक जीवमात्राच्या हिताची काळजी घेतलेली आहे. तुकोबाराय आणखी एका अभंगात सांगतात की वैष्णवांना जातीधर्माचे नियम लागू होत नाहीत असा वेदशास्त्रांचा अभिप्राय आहे. 


तुकोबाराय या रितीने वेदांचा समतावादी अर्थ लावायला लागले तेव्हा पारंपरिक वैदिक लोक खवळले. एकतर तुकोबाराय अधिकार नसताना वेदांचा अर्थ सांगत होते आणि तो अर्थही प्रचलित अर्थाच्या अगदी विरुद्ध होता. उलटापालट करणारा होता. साहजिकच मंबाजी आणि रामेश्वरशास्त्री अशा लोकांनी तुकोबारायांच्या या वेदार्थाच्या समतावादी प्रतिपादनावर आक्षेप घ्यायला सुरुवात केली. त्याला प्रस्तुत अभंगातून तुकोबारायांनी जोरदार उत्तर दिलं आहे. तुकोबाराय म्हणतात की वेदांचा खरा अर्थ आम्हालाच माहित आहे. ज्या लोकाना वेदांचा अधिकार आहे ते केवळ वेदाच्या गोण्या वाहतात. ही मंडळी गोण्या वाहणारे हमाल आहेत. केवळ वरकरणी पाहून एखाद्या पदार्थाची गोडी कळत नाही तर त्यासाठी त्या पदार्थाची चव चाखून बघावी लागते. हा दृष्टांत देऊन तुकोबाराय म्हणतात की त्याचप्रमाणे ही वेदपाठक मंडळी वरकरणी वेद वाचतात पण त्याचा अनुभव घेत नाहीत. उत्पत्ती, पालन आणि संहार या तीन गोष्टी ज्याच्या हातात आहेत त्या ईश्वराला विसरुन हे केवळ वेदांवर विसंबून राहतात. 'वेदविद जरी जाहला। माते नेणता वाया गेला। कणु सांडूनी उपणिला। भुसा जैसा॥' असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. वेदांच्या केवळ अक्षरांवर विसंबून राहणारे लोक ईश्वराला विसरतात. त्यामुळे वेदज्ञ लोकांचा व्यवहार धान्य उफणताना दाणे सांडून फोलपट घेण्यासारखा मूर्खपणाचा ठरतो.


तुकाराम महाराजांनी वेदांचा समतावादी अर्थ लावला. त्यासाठी त्यांनी सनातनी वैदिक शास्त्रीपंडितांशी संघर्ष केला. पुढच्या काळात वेदांचा असाच समतावादी अन्वयार्थ महर्षी दयानंद सरस्वती यांनी लावला. आर्य समाजाच्या माध्यमातून त्यांनी समतेची शिकवण दिली. ते वैदिक ब्राह्मण असूनही वेदांचा समतावादी अर्थ लावतात म्हणून सनातन्यांनी त्यांचा अनन्वित छळ केला. त्यांच्या मिरवणुकीला विरोध केला. त्या पार्श्वभूमीवर वारकरी आणि कुणबी असलेल्या तुकोबारायांनी वेदांचा समतावादी अर्थ लावणं त्या काळातल्या सनातनी वैदिकांना फारच झोंबलं असणार. आर्य समाज आणि वारकरी संप्रदाय यात वेदांचा समतावादी अर्थ लावणं याबाबतीत मतैक्य असलं तरी इतर बाबतीत मतभेद आहेतच. आर्य समाज वैदिक असल्यानं त्यांच्यात बहुदेवतोपासना आणि यज्ञादी कर्मकांड आहे. हे कर्मकांड आणि बहुदेवतोपासना वारकरी संप्रदायात नाही. वेदांचा समतावादी अर्थ लावण्याबाबत वारकरी संप्रदायाचा विचार आणि प्राज्ञपाठशाळेतील धर्मपंडितांचा विचार समानच आहे. वाईला प्राज्ञपाठशाळा आहे. त्याची सुरुवात स्वामी केवलानंद सरस्वती यांनी केलेली होती. त्यांनी वेदात अस्पृश्यता आणि जातीयतेला जागा नाही याची साधार मांडणी केलेली होती. या प्राज्ञपाठशाळेत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यापासून ते विनोबांपर्यंत अनेक दिग्गज विचारवंत घडले. या पाठशाळेतील पंडित आणि सनातनी पंडित यांच्यात एक मोठा वैचारिक वाद येरवडा जेलला झाला होता. या शास्त्रार्थावेळी वेदात अस्पृश्यता नाही ही बाजू प्राज्ञपाठशाळेतील पंडितांनी मांडली तर वेदात अस्पृश्यता आहे ही बाजू सनातनी पंडितांनी मांडली. वेदाचा विषमतावादी अर्थ लावणारी जी सनातनी पंडित मंडळी होती त्यात भारतभरातील पंडित होते. त्यात पंढरपूरचे भगवानशास्त्री धारुरकरही होते. त्यांनी वेदांच्या आधारे अस्पृश्यतेचं समर्थन केलं. वेदाचा अर्थ जातीय विषमतेच्या अनुषंगाने लावला. या वादात वारकरी मंडळींचा सहभाग नव्हता. खरंतर वारकऱ्यांनी तुकोबांना अनुसरुन वेदांचा समतावादी अर्थ लावणार्‍या पंडितांची त्याबाबतीत बाजू घेणं अपेक्षित होतं, पण तसं घडलं नाही. वारकऱ्यातील काही मंडळी भगवानशास्त्रींच्या म्हणजे वेदांचा विषमतावादी अर्थ लावणार्‍या पंडितांच्या विद्वतेच्या प्रभावात आली. याच भगवानशास्त्री धारुरकरांना गुरु मानून त्यांच्याकडून वेदांताचे पाठ गिरवण्यात काही वारकरी मुखंडांनी धन्यता मानली. पुढच्या काळात या भगवानशास्त्री धारुरकरांना लोक वेदांपेक्षा संतांना जास्त मानतात हे लक्षात आलं. त्यामुळं त्यांनी १९४८ नंतर वारकरी संतांचा आणि विशेषतः तुकोबारायांच्या अभंगांचा अर्थ वेदांती चौकटीत लावायला सुरुवात केली. तुकोबारायांच्या अभंगावर ते वेदांती चौकटीत भाष्य करायला लागले. हे भाष्य श्रवण करायला वारकरी संप्रदायातील दिग्गज मंडळी जात होती. आजही त्यांच्या या भाष्यश्रवणाचा प्रभाव असलेली काही वारकरी मंडळी आहेत. संतांनी वेदांचा समतावादी अर्थ लावला आणि 'वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा' असं गर्जून सांगितलं. आज त्याच संतांच्या अभंगांचा अर्थ काही लोक जेव्हा वैदिक धर्माच्या चौकटीत जातीय विषमतेला अनुकूल लावतात त्यावेळी आपण 'संतांचा तो अर्थ आम्हासीच ठावा' म्हणण्याची गरज आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एका काॅलगर्लची डायरी - भाग 1

युध्द पेटले आहे – जगण्याचा चंग आणि संघर्षाच्या गर्जना करणा-या माणसांच्या कविता.

सत्यवती: एक शापित कुमारी